( रत्नागिरी / वार्ताहर )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेत सहाय्यक कामगार आयुक्त पदावर निवड झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतील नियमित स्पर्धा परीक्षार्थी अजय तोडकर यांचा अकादमीतर्फे गौरव करण्यात आला. अकादमीच्या अभ्यासिकेत आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि स्पर्धा परीक्षार्थी उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल, संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या ॲड. प्राची जोशी, सीए मंदार गाडगीळ, सुहासभाऊ पटवर्धन, डॉ. केतकर, मनोज पाटणकर, अकादमीच्या समन्वयक ॲड. सोनाली खेडेकर, अध्यापक तेजस कळंबटे, प्रथमेश वाडकर आणि कर्मचारी सोनाली मोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अजय तोडकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशामागील चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
‘अकादमीच्या वातावरणाचा यशात मोलाचा वाटा’
सत्काराला उत्तर देताना अजय तोडकर यांनी आपल्या यशात अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. अकादमीने अभ्यासासाठी शांत आणि पोषक वातावरण, आवश्यक सुविधा तसेच सहकार्यपूर्ण स्पर्धेचे वातावरण उपलब्ध करून दिल्यामुळे तयारीत सातत्य राखणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.
‘अजय तोडकर यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी’
अकादमीच्या समन्वयक ॲड. सोनाली खेडेकर यांनी अजय तोडकर यांच्या अभ्यासू आणि सहकार्यशील व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. स्वतःच्या स्पर्धा परीक्षा तयारीतील अनुभव ते इतर विद्यार्थ्यांसोबत सातत्याने शेअर करून त्यांना मार्गदर्शन करत असत. अकादमीच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांनी सहकार्याची भूमिका बजावली. त्यांचा हा प्रवास इतर स्पर्धा परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी असल्याचे खेडेकर यांनी सांगितले.
१० ऑगस्टपासून तलाठी भरतीसाठी फास्टट्रॅक बॅच
दरम्यान, कार्यक्रमात स्पर्धा परीक्षार्थींसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली. १० ऑगस्टपासून तलाठी भरती (MPSC गट ‘क’ परीक्षा) फास्टट्रॅक बॅच सुरू करण्यात येणार असून, अल्पावधीत नियोजनबद्ध आणि प्रभावी तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले.
अजय तोडकर यांच्या यशामुळे अकादमीतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या यशातून आगामी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

