( नवी दिल्ली )
होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) परिसरातील तणाव वाढत असताना भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 94,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन दोन महत्त्वाची जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. Ministry of Petroleum and Natural Gas यांनी दिलेल्या माहितीनुसार, BW TYR आणि BW ELM ही एलपीजी वाहतूक करणारी जहाजे कोणत्याही अडथळ्याशिवाय मार्गक्रमण करत आहेत. यापैकी BW TYR हे जहाज उद्या 31 मार्च रोजी मुंबईत, तर BW ELM हे जहाज 1 एप्रिल रोजी न्यू मंगळुरू येथे पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजांच्या आगमनामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावर होणारा संभाव्य ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
भारतीय जहाजे आणि नाविकांवर 24 तास नजर
सरकारने पश्चिम पर्शियन आखात क्षेत्रातील भारतीय जहाजे आणि नाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. सध्या या भागात 18 भारतीय ध्वज असलेली जहाजे आणि सुमारे 485 भारतीय नाविक कार्यरत आहेत.
Directorate General of Shipping हे विभाग जहाज मालक, RPSL एजन्सी आणि भारतीय दूतावासांशी समन्वय साधून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहे.
देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा
सरकारने स्पष्ट केले आहे की देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच युरिया कारखान्यांसाठी गॅस पुरवठा स्थिर ठेवण्यात आला असून अतिरिक्त LNG आणि RLNGचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी Indian Navy ची युद्धनौका सज्ज ठेवण्यात आली आहेत. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून ऊर्जा सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जात असून, सध्यातरी देशातील इंधन पुरवठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

