( मुंबई )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी दहावी आणि बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी वेगवेगळी प्रतीक्षा करावी लागणार नाही. बोर्डाकडून दोन्ही कागदपत्रे एकाच वेळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच बोर्डाने मार्कशीट आणि सर्टिफिकेटमध्ये मोठे बदल करत त्यावर विद्यार्थ्याचा फोटो आणि QR कोड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या QR कोडमुळे विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती काही सेकंदांत पडताळता येणार असून बोगस कागदपत्रांवर प्रभावी नियंत्रण येणार आहे.
दरवर्षी निकालानंतर विद्यार्थ्यांना आधी मार्कशीट मिळत असे, मात्र सर्टिफिकेट मिळण्यासाठी साधारण सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून दोन्ही कागदपत्रे एकाच वेळी उपलब्ध होणार आहेत.
नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या असून आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र निकाल लवकर जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
नव्या मार्कशीटमध्ये आधारकार्डनुसार विद्यार्थ्याचे नाव, फोटो आणि QR कोड समाविष्ट असणार आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याची अधिकृत माहिती लगेच उपलब्ध होणार असल्याने निकालाची सत्यता पडताळणे अधिक सोपे होणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.

