(गुहागर / प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला नव्या पुलाचा अंदाजपत्रक (इस्टिमेट) तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पुलास त्वरित मंजुरी मिळवून काम सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी अचानक लोखंडी साकव कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत दहा ते बारा गुरे जखमी झाली, तर एका बैलाचा मृत्यू झाला. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच सभापती पोळेकर यांनी प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. जखमी जनावरांवर त्वरित उपचार करावेत तसेच मृत बैलाच्या मालक शेतकऱ्याला शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. त्यानुसार प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि शासकीय मदतीची कार्यवाहीही सुरू केली.
दरम्यान, मंगळवारी सकाळी पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनामार्फत आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी सभापती पोळेकर यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून पुलाच्या उभारणीसंदर्भातील पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी डेप्युटी इंजिनिअर आशुतोष सरदेसाई, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कुटगिरी गावठणवाडीसाठी हा मार्ग दैनंदिन दळणवळणाचा प्रमुख दुवा असल्याने नव्या पुलाचे काम कोणताही विलंब न लावता सुरू व्हावे, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका सभापती प्रणव पोळेकर यांनी यावेळी मांडली.

