(पुणे / वृत्तसंस्था)
जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून तब्बल 88 कोटी रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या आणि गेल्या काही काळापासून फरार असलेल्या विशाखा राठोडला अखेर अटक करण्यात आली आहे. परदेशात फरार झालेल्या विशाखा राठोडला केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने UAE मधून भारतात आणण्यात आले. त्यानंतर तिला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी (5 ऑगस्ट) तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे पुण्यातील बहुचर्चित गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
जादा परताव्याचे आमिष, 88 कोटींच्या अपहाराचा आरोप
पुण्यातील बाणेर परिसरातील एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून आरोपींनी गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कराराचा भंग करून फिर्यादीचे 86 लाख 37 हजार रुपये, तसेच इतर गुंतवणूकदारांचे मिळून सुमारे 88 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी एप्रिल 2023 मध्ये पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अविनाश अर्जुन राठोड, विशाखा राठोड आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचे आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच दोघेही फरार
गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश आणि विशाखा राठोड हे दोघेही फरार झाले होते. दोघेही मूळचे अमरावतीचे असून पुण्यातील रावेत येथील आनंदबन सोसायटीमध्ये राहत होते. ते परदेशात पळून गेल्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणांनी त्यांचा शोध सुरू केला. एप्रिल 2024 मध्ये दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर विशेष एमपीआयडी न्यायालयाने दोघांविरुद्ध अटक वॉरंट तसेच जाहीर नोटीस काढली. तपास पुढे जात असताना जून 2026 मध्ये अविनाश राठोड आणि विशाखा राठोड यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. या नोटीसमुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि त्याला भारतात प्रत्यार्पित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत समन्वय साधण्याचा मार्ग मोकळा झाला. भारतातील इंटरपोल प्रकरणांसाठी नोडल एजन्सी असलेली सीबीआय, फरार गुन्हेगारांना परत आणण्यासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राधिकरणांसोबत सातत्याने काम करत आहे. पुणे विमानतळावर दाखल होताच महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले.
UAE मधून भारतात आणले, आता पुणे पोलिसांच्या ताब्यात
रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे UAE प्रशासनाने अविनाश राठोडला ताब्यात घेतले. त्यानंतर 23 जुलै 2026 रोजी त्याला भारतात आणण्यात आले. दरम्यान, विशाखा राठोडचा शोधही सुरू होता. अखेर तिलाही UAE मधून भारतात आणण्यात आले. परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. भारतात आणल्यानंतर विशाखा राठोडला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कोर्टात हजर करताच 10 दिवसांची पोलीस कोठडी
विशाखा राठोडला बुधवारी (5 ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम, कंपनीचे व्यवहार, परदेशातील वास्तव्य तसेच इतर आरोपी आणि साथीदारांशी असलेले संबंध याबाबत तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने विशाखा राठोडला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
88 कोटींच्या फसवणुकीचा तपास आणखी खोलवर जाणार
या प्रकरणाचा तपास आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम नेमकी कुठे वळवण्यात आली, या पैशांचा वापर कसा करण्यात आला, परदेशात कोणते आर्थिक व्यवहार झाले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.
पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सीबीआयने नोडल अधिकारी म्हणून भूमिका बजावली. मागील महिन्यात अविनाश राठोडला अटक करण्यात आली होती. आता विशाखा राठोडलाही अटक झाली असून, दोघांवर गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून सुमारे 88 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
विशाखा राठोडच्या पोलीस कोठडीदरम्यान या आर्थिक फसवणुकीतील आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे आता पोलिसांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष लागले आहे.

