(सातारा)
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात मोठी घडामोड घडली समोर आली आहे. मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याचा मोबाईल त्याच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जमा केला, अशी माहिती डीवायएसपी विशाल खांबे यांनी दिली.
संशयितांना आज (गुरुवार) न्यायालयात हजर करणार
या प्रकरणात अटकेत असलेले उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सॉफ्टवेअर इंजिनियर प्रशांत बनकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (गुरुवारी) संपत आहे. त्यामुळे दोघांनाही फलटण जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मोबाईलच्या तपासासाठी पोलिसांकडून बदनेच्या वाढीव कोठडीची मागणी होणार आहे. प्रशांत बनकर याला पुढे न्यायालयीन कोठडीत पाठवायचं की पोलिस कोठडीत ठेवायचं, याबाबतचा निर्णय आज होईल.
तळहातावरचे “ते” शब्द आणि गुन्ह्याचा तपास
मृत डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेल्या संदेशात “बदनेनं माझ्यावर बलात्कार केला” आणि “प्रशांतनं मानसिक छळ केला” असे आरोप लिहिलेले होते. या आत्महत्येचा तपास सातारा पोलीस करत असून, या संदेशातील हस्ताक्षराची पडताळणी सुरू आहे. हस्ताक्षर तज्ञांकडून रिपोर्ट आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढता येईल असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केलं की, आतापर्यंतच्या तपासानुसार ही आत्महत्येची घटना असल्याचं दिसतं आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजनुसार, डॉक्टर राहत असलेल्या खोलीत कोणीही प्रवेश केला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.
घटनेपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
२३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री डॉक्टर तरुणीनं फलटणमधील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली, आणि दुसऱ्या दिवशी (२४ ऑक्टोबर) सकाळी तिचा मृतदेह सापडला. आज समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती हॉटेलमध्ये एकटीच प्रवेश करताना दिसते, यामुळे घटनेच्या आधीच्या घडामोडींवर पोलिसांचा फोकस वाढला आहे.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) यांनी राज्य सरकारकडे या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटीमार्फत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. मार्डने मृत डॉक्टरच्या कुटुंबाला ५ कोटींची आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचंही आवाहन केलं आहे. संघटनेनं या प्रकरणात राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली व्हावी, अशीही मागणी केली आहे.
मार्डच्या इतर मागण्या
- डॉक्टरच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
- डॉक्टरांसाठी मानसिक आरोग्य सहाय्य यंत्रणा
- पीओएसएच समित्यांचे पुनरुज्जीवन
- आरोग्य सुरक्षा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी
- तपासाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड एसआयटीकडे सुपूर्द करणे
- राज्यभर शांततापूर्ण आंदोलनाचा आराखडा
या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यभर शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा
- २९ ऑक्टोबर : डॉक्टर काळ्या फिती लावून सेवा देतील
- ३० ऑक्टोबर : “दबलेला आवाज” प्रतिकात्मक निषेध — तोंडाला काळी टेप
- ३१ ऑक्टोबर : डिजिटल मोहिम
- १-२ नोव्हेंबर : गेटवे ऑफ इंडिया आणि सीएसएमटी येथे मेणबत्ती मोर्चा
- ३ नोव्हेंबरपासून : आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार
मार्डने स्पष्ट केलं आहे की आंदोलन शांततापूर्ण आणि संघटित पद्धतीने होईल. मात्र, शासनानं ठोस कारवाई केली नाही, तर सर्व वैद्यकीय संघटना आझाद मैदानावर उतरतील, असा इशारा संघटनेनं दिला आहे.

