(मुंबई / वृत्तसंस्था)
कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षणासोबतच अत्याधुनिक संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या संस्थेमुळे कोकणातील कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण, कौशल्य विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या संस्थेच्या स्थापनेसंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्यमंत्री योगेश कदम, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलसचिव डॉ. संजय भावे, उपसचिव प्रतिभा पाटील यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
वाकवलीत संस्थेसाठी अनुकूल पायाभूत सुविधा
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रात पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि संशोधनासाठी आवश्यक विस्तीर्ण क्षेत्र उपलब्ध आहे. त्याचबरोबर संशोधनासाठी प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा तसेच लागवडीयोग्य जमीन उपलब्ध असल्याने या ठिकाणी पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था उभारण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
नवीन संस्थेमुळे कोकणातील कृषी संशोधनाला मोठी चालना मिळेल. स्थानिक हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि कोकणातील विविध पिकांच्या अनुषंगाने संशोधनाला अधिक व्यापक स्वरूप देता येईल. त्याचबरोबर कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षणासाठी स्थानिक पातळीवरच दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासालाही गती मिळेल, असे भरणे यांनी सांगितले.
‘कोकणासाठी हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल’
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणासाठी वाकवली येथील पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे. या संस्थेमुळे कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यातील इतर भागांत जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच उच्च कृषी शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध होतील. संशोधन, कौशल्य विकास आणि स्थानिक कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.
कोकणातील कृषी संशोधनाला मिळणार बळ
वाकवली येथे पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था उभारल्यास उच्च कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून या संस्थेचा विकास होऊ शकतो. कोकणातील भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी, फळबागा आणि अन्य कृषी पिकांशी संबंधित स्थानिक प्रश्नांवर संशोधन करण्यासाठीही या संस्थेचा उपयोग होणार आहे.
शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर झाल्यानंतर संस्थेची रचना, अभ्यासक्रम, आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि निधी याबाबत पुढील प्रक्रिया निश्चित होण्याची शक्यता आहे.

