(संगमेश्वर /प्रतिनिधी)
गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी सोनवी नदीच्या काठावर जमलेल्या माभळेकरांच्या आनंदावर शनिवारी सायंकाळी अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. विसर्जनाच्या पवित्र क्षणी नदीपात्रात उतरलेले पुरुषोत्तम गुणाजी घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल घडशी अचानक पाण्याच्या प्रवाहात सापडले. काही क्षणांतच दोघेही प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले आणि नदीकाठावर एकच आरडाओरड सुरू झाली. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे पुरुषोत्तम यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र अवघ्या काही वर्षांच्या प्रज्वलला नियतीच्या क्रूर तडाख्यात जीव गमवावा लागला. या घटनेने माभळेसह संगमेश्वर परिसर सुन्न झाला असून घडशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माभळे येथील घडशी कुटुंबीय आणि वाडीतील ग्रामस्थ शनिवारी गणपती विसर्जनासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्यासमोरील सोनवी नदीकाठी गेले होते. गणरायाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जनाची तयारी सुरू होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता. मात्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेली घटना काही क्षणांतच या आनंदाला काळ्या आठवणीत बदलून गेली. विसर्जनासाठी पुरुषोत्तम घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल हे दोघेही नदीपात्रात उतरले. मात्र नदीच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागले. क्षणार्धात घडलेले हे दृश्य पाहून नदीकाठावर उपस्थित ग्रामस्थांची धावपळ उडाली.
पिता-पुत्र पाण्यात बुडत असल्याचे दिसताच गुणाजी घडशी आणि दत्ताराम घडशी यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. प्रज्वलनेही जीव वाचविण्यासाठी आजोबांचा हात पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्या क्षणी त्याला वाचविण्याची आस प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर होती. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्याचा हात निसटला आणि तो पुन्हा प्रवाहाच्या ताब्यात गेला. नदीकाठावर उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण ठरला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच श्रीकांत घडशी यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत पुरुषोत्तम घडशी यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे एका जीवाला वाचविण्यात यश आले.
मात्र प्रज्वलचा शोध सुरूच होता. त्याला शोधण्यासाठी गोपाळ समाजातील युवकांसह ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून शोधमोहीम हाती घेतली. प्रत्येक क्षण आशेचा आणि चिंतेचा होता. सुमारे २० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रज्वलला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्याचे प्रयत्न झाले; मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
गणरायाला निरोप… अन् कुटुंबावर दुःखाचा डोंगर
ज्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यासाठी घडशी कुटुंबीय नदीकाठी आले होते, त्याच ठिकाणी कुटुंबातील चिमुकला सदस्य कायमचा दूर गेला. काही क्षणांपूर्वी गणरायाच्या जयघोषाने दुमदुमणारा नदीकाठ प्रज्वलच्या मृत्यूच्या बातमीने स्तब्ध झाला. कुटुंबीयांचा आक्रोश, ग्रामस्थांची धावपळ आणि डोळ्यांसमोर घडलेली ही दुर्दैवी घटना यामुळे वातावरण अक्षरशः गलबलून गेले. गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी झालेल्या माभळे परिसरावर या घटनेने शोककळा पसरली आहे. एका कुटुंबासाठी गणरायाचा निरोप हा आयुष्यभर न विसरता येणाऱ्या दुःखद आठवणीत बदलला. प्रज्वलच्या दुर्दैवी मृत्यूने घडशी कुटुंबीयांवर कोसळलेले दुःख शब्दांत मावणारे नाही. परिसरातील ग्रामस्थांकडून कुटुंबीयांप्रती तीव्र शोकभावना व्यक्त होत आहेत.


