(लांजा/ रत्नागिरी)
दुचाकीची कोणतीही कागदपत्रे जवळ नसणे, तसेच वाहनाच्या मालकाचा ठावठिकाणाही सांगता न आल्याने सदर वाहन चोरीचे असल्याचा संशय निर्माण झाल्याने लांजा पोलिसांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कोर्ले फाटा ते गंथाडे हॉटेल मार्गावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित लालमन वर्मा (वय ४५, रा. रामदास पानवाले चाळ, तेलीवाडी, वैभववसाहत, ता. लांजा) याच्या ताब्यात एमएच १२ एजी ५१३३ क्रमांकाची दुचाकी आढळून आली. पोलिसांनी वाहनाबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे दुचाकीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समोर आले. तसेच वाहन कोणाच्या मालकीचे आहे आणि त्याचा मालक कुठे आहे, याबाबतही समाधानकारक माहिती देता आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित दुचाकी चोरीची असण्याचा पोलिसांना सकारण संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली. कोर्ले फाटा ते गंथाडे हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सद्गुरू कृपा स्टोअरसमोर ही घटना घडली.
या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यातील पोलीस शिपाई सूरज मौला नाईकवाडे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून रोहित वर्मा याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुचाकी नेमकी कोणाच्या मालकीची आहे, तिच्या कागदपत्रांची स्थिती काय आहे आणि ती चोरीची आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गुन्हा १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.०८ वाजता दाखल करण्यात आला.


