(दापोली / प्रतिनिधी)
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, या आनंदोत्सवात मुक्या जीवांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, असे आवाहन वाईल्ड अॅनिमल रेस्क्यूअर अॅण्ड रिसर्च या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद गोरीवले यांनी केले आहे.
मकरसंक्रांत हा वर्षारंभाचा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला वाण वाटून सण साजरा करतात, तर लहान मुले व युवक पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मात्र, काही ठिकाणी पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायनीज मांजा हा अत्यंत धारदार असल्याने तो झाडांवर अडकून राहतो. अशा मांजामध्ये अनेक पक्षी अडकून गंभीर जखमी होतात. काही पक्ष्यांना कायमचे अपंगत्व येते, तर काहींना प्राणही गमवावे लागतात, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, रस्त्यांवर उडणाऱ्या मांजामुळे दुचाकीस्वारांचा गळा कापला जाण्याच्या घटना काही भागांत घडल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पतंग उडवताना मोकळ्या जागेची निवड करावी, झाडांच्या आसपास पतंग उडवणे टाळावे, तसेच झाडांवर अडकलेले मांजे तातडीने काढून टाकावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणताही पक्षी मांजामध्ये अडकलेला आढळून आल्यास त्वरित वनविभाग किंवा जवळील प्राणीमित्र संस्थेशी संपर्क साधावा, असेही आवाहन संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोरीवले, उपाध्यक्ष मनीत बाईत आणि सचिव तुषार महाडिक यांनी केले आहे. मकरसंक्रांतीच्या काळात तसेच जानेवारी महिन्यात पतंग उडवण्याचा छंद मोठ्या प्रमाणात वाढतो. मात्र सण साजरा करताना सामाजिक भान आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन राखणे तितकेच आवश्यक आहे. वापरला जाणारा मांजा दोरा माणसांसह पक्ष्यांसाठीही सुरक्षित असावा, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

