(दापोली)
शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती म्हणजे त्यांच्या कार्याची पोचपावतीच असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी सोमवार १४ एप्रिल रोजी दापोलीत सुर्वे यांचा सन्मान करतांना व्यक्त केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जीवन सुर्वे हे माझ्या दापोली मतदार संघातील असल्याने त्यांचा झालेला सन्मान व त्यांना देण्यात आलेले राष्ट्रीय पातळीवरील पद ही माझ्यासाठी देखील अभिमानास्पद बाब असल्याचे मत ना. योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले.
राज्याचा राज्यमंत्री आणि मतदार संघाचा हक्काचा माणूस या नात्याने आपण सदैव शिक्षकांसोबत असून प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण शिक्षक संघटनेच्या सदैव पाठीशी असल्याचे स्पष्ट मत ना. योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेतील निवड झालेल्या इतर पदाधिकार्यांचेही अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या सत्कार प्रसंगी दापोली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगावकर, दापोली तालुका कोषाध्यक्ष महेंद्र खांबल उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, तालुकाप्रमुख उन्मेश राजे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या चारुता कामतेकर यांनीही जीवन सुर्वे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.