(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (बुधवारी, ५ ऑगस्ट) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले. जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्याच्या कामासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे चिपळूण तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ४८ वर्षीय सेवानिवृत्त मर्चंट नेव्ही कर्मचारी आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावर सावर्डे येथे खाते क्रमांक ८९४, गट क्रमांक १३४७/३, क्षेत्रफळ २१८ चौरस मीटर जागा खरेदीखताने घेतलेली आहे. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद करून ती मंजूर करण्याच्या कामासाठी तक्रारदार यांनी ३ ऑगस्ट रोजी मंडळ अधिकारी अनिल जाधव यांची भेट घेतली होती.
यावेळी सदर फेरफार मंजूर करण्यासाठी जाधव यांनी तक्रारदारांकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी ३ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये मंडळ अधिकारी अनिल जाधव यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
त्यानंतर सावर्डे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार कार्यालयात गेल्यानंतर जाधव यांनी पाच हजार रुपयांची रोख रक्कम त्यांच्या जवळील नोटबुकमध्ये ठेवण्यास सांगितले. तक्रारदाराने लाचेची रक्कम नोटबुकमध्ये ठेवल्यानंतर ती स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी ३ वाजता अनिल जाधव यांना रंगेहाथ पकडले.
दोन वर्षांपासून काम रखडल्याचा आरोप
खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहाराची नोंद होणे आवश्यक असल्याने तक्रारदाराने संबंधित कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, काम प्रलंबित राहिले होते. अखेर हे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी जाधव यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश आनंदराव पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक मच्छिद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, पोलीस हवालदार संजय गोपाळ वाघाटे, विशाल दिलीप नलावडे, दीपक बाळू आंबेकर आणि महिला पोलीस हवालदार श्रेया सुशांत विचारे यांचा समावेश होता.
महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
जमिनीच्या नोंदी, फेरफार, खरेदीखत आणि अन्य महसुली कामांसाठी नागरिकांना संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागते. अशा कामांमध्ये अनावश्यक विलंब करून त्यानंतर लाचेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येतात.
सावर्डे येथील या कारवाईमुळे महसूल विभागातील प्रलंबित कामे आणि त्यासाठी नागरिकांना करावा लागणारा पाठपुरावा याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामासाठी लाचेची मागणी झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.
लाच मागितल्यास थेट ACBकडे तक्रार करावी
शासकीय काम करून देण्यासाठी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येते. लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी रंगेहाथ पकडल्याच्या या कारवाईमुळे शासकीय कामांसाठी लाचेची मागणी करणाऱ्यांना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


