(दापोली)
तालुक्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे उल्लंघन करून ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) या मौल्यवान पदार्थाची अवैध वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर दापोली सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विश्वसनीय माहितीनंतर, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ४ किलो ८३३ ग्रॅम वजनाचे ‘अंबरग्रीस’ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
सीमा शुल्क विभागाला ‘अंबरग्रीस’च्या अवैध वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने दापोली एस.टी.स्थानक परिसरात सापळा रचला. त्यादरम्यान संशयित मारुती वॅगन आर वाहनाचा पाठलाग करून ते अडवण्यात आले. वाहनाच्या तपासणीदरम्यान पांढऱ्या-पिवळट छटांचे तपकिरी रंगाचे घन पदार्थ आढळले, ज्याची ओळख ‘अंबरग्रीस’ म्हणून पटली. एकूण ४ किलो ८३३ ग्रॅम वजनाचे हे पदार्थ जप्त करण्यात आले.
अंबरग्रीस हा स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेत तयार होणारा मिनरलसारखा मेणयुक्त पदार्थ आहे. त्याचा वापर उच्च प्रतीच्या सुगंधी द्रव्यांच्या निर्मितीत केला जातो. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची किंमत असली, तरी वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार त्याची विक्री, खरेदी किंवा वाहतूक पूर्णतः बेकायदेशीर आहे. या कारवाईदरम्यान वापरलेले वाहन, संशयितांकडील विविध कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. अटकेत घेतलेल्या चारही संशयितांना दापोली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले असून, पुढील तपास वन्यजीव संरक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
ही कारवाई सीमा शुल्क अधीक्षक (प्रतिबंधक आणि गुप्तचर) श्री. अतुल व्ही. पोटदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात निरीक्षक प्रतीक अहलावत, रामनिक सिंग तसेच हवालदार सुहास विलाणकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौर्या, हेमंत वासनिक आणि सचिन गावडे यांचा समावेश होता.

