(मंडणगड /रत्नागिरी प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आंबडवे येथे भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन, अनागारिक धम्मपाल जयंती तसेच पाली भाषा व धम्मलिपी पखवाडा अभियानानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाली भाषा, धम्मलिपी आणि भगवान बुद्धांच्या धम्माचा अधिक सखोल अभ्यास करून हे ज्ञान समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान विजय यशवंत जाधव होते. भारतीय बौद्ध महासभेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आयुष्यमान अनंत सावंत गुरुजी तसेच पाली भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेले प्रा. दिलीप वामनराव वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात हर्षद जाधव, अरुणकुमार मोरे, अनिल घाडगे, अनामिका जाधव, संजय आयरे आणि सुदर्शन सकपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत आणि पाली विभागाचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप वासनिक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विजय जाधव यांनी भैय्यासाहेब आंबेडकर आणि अनागारिक धम्मपाल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यातील विविध पैलू, सामाजिक योगदान आणि वैचारिक वारसा याविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पाली भाषा आणि धम्मलिपीच्या अभ्यासातून प्राप्त झालेले ज्ञान केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित न ठेवता ते समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता या वेळी अधोरेखित करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील पाली भाषा व धम्मलिपी अभ्यासकांनी या दिशेने सातत्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. पाली भाषा, धम्मलिपी तसेच भगवान बुद्धांच्या धम्माचा अधिकाधिक अभ्यास करून त्यातून मिळणारे ज्ञान समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा, तालुका व ग्राम शाखांचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, मान्यवर श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, सैनिक तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभागाचे सचिव अल्पेश सकपाळ यांनी केले.


