(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाच्या नावाखाली कोरीव दगडाचे बांधकाम करून दुभाजकात लावलेल्या शोभेच्या झाडांची देखभाल मात्र पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचे चित्र रेल्वे स्टेशन रोडवर पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामुळे शोभेच्या झाडांमध्ये रानटी गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याकडे संबंधित प्रशासन आणि ठेकेदाराने अक्षरशः पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
दुभाजकातील झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या असून त्या थेट वाहनांच्या मार्गात येत आहेत. दुचाकीस्वारांसह चारचाकी चालकांना या फांद्यांचा चुकवाचुकवीचा खेळ खेळत प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या फांद्या नजरेस न पडल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
दुभाजकात वृक्षारोपण करणे ही केवळ दिखाऊ मोहीम नसून त्यांची नियमित छाटणी, तणनियंत्रण आणि देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील झाडांची दुरवस्था पाहता, हा ठेकेदार नेमका गायब कुठे झाला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. करारातील अटींचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी करण्याची तसदीही संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसत नाही. सर्वाधिक खेदजनक बाब म्हणजे, वाहनचालकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची अशी दुर्दशा होत असेल, तर त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कारवाई कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
रेल्वे स्टेशन रोडवरील दुभाजकातील झाडांची तातडीने छाटणी करून रानटी झुडपे हटवावीत, तसेच देखभालीत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे. विकासकामांचा गवगवा करण्यापेक्षा ती सुरक्षित आणि दर्जेदार ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने आता तरी स्वीकारावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे.

