(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोकणातील नागमोडी वळणे, मुसळधार पाऊस, कडक ऊन आणि अवघड घाटरस्ते… या सगळ्यांवर मात करत हजारो प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणारी ‘लालपरी’ ही केवळ एसटी बस नाही, तर ती अनेक कुटुंबांना जोडणारी जीवनवाहिनी आहे. या लालपरीचे स्टीअरिंग तब्बल २८ वर्षे अत्यंत जबाबदारीने सांभाळणारे देवरूख आगारातील चालक संतोष कृष्णा कीर यांचा सेवाप्रवास ३१ जुलै २०२६ रोजी थांबला. २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत सलग २५ वर्षे विनाअपघात सेवा बजावत त्यांनी एसटीच्या सेवेत एक आदर्श निर्माण केला.
लालपरी आणि संतोष कीर यांचे नाते केवळ नोकरीपुरते मर्यादित नव्हते. बसचे स्टीअरिंग हातात घेताना त्यांच्या मनात कायम एकच विचार असायचा, ‘माझे कुटुंब जसे माझी वाट पाहते, तसेच माझ्या बसमधील प्रत्येक प्रवाशाचीही कोणीतरी घरी वाट पाहत असते.’ याच जाणिवेतून त्यांनी प्रवाशांची सुरक्षितता आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीइतकीच पवित्र मानली.
‘प्रत्येक प्रवासी सुखरूप घरी पोहोचला पाहिजे’
संतोष कीर जेव्हा बसचे स्टीअरिंग हातात घेत असत, तेव्हा आजारपण असो किंवा थकवा, त्यांच्या मनात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार प्रथम असायचा. ‘माझ्या गाडीत बसलेला प्रत्येक प्रवासी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचला पाहिजे,’ हीच त्यांची भूमिका असल्याचे ते सांगतात.
पत्नी आणि मुले जशी त्यांच्या सुखरूप परतीची वाट पाहत असत, तशीच प्रत्येक प्रवाशाच्या घरची माणसे त्याची वाट पाहत असतात, याची जाणीव त्यांनी कायम मनात ठेवली. त्यामुळे कोकणातील धोकादायक वळणे, मुसळधार पाऊस किंवा कडक ऊन यापैकी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी स्टीअरिंगवरील आपली पकड ढळू दिली नाही.
१९९७ मध्ये सुरू झाला ‘लालपरी’सोबतचा प्रवास
संतोष कीर यांनी १९९७ मध्ये लांजा आगारातून कै. बाळाकृष्ण (बापूदादा) कीर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर लांजा, चिपळूण, खेड आणि देवरूख या आगारांमध्ये त्यांनी सेवा बजावली.
वाहनाची नियमित निगा राखणे, इंधनाची बचत करणे, आगाराचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लावणे आणि प्रवाशांना सुरक्षित सेवा देणे याला त्यांनी कायम प्राधान्य दिले. त्यांच्या उत्कृष्ट आणि निष्कलंक सेवेची दखल घेत एसटी महामंडळाने ५, १०, १५, २० आणि सलग २५ वर्षे विनाअपघात सुरक्षित सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव केला.
वारी असो वा गणेशोत्सव; संकटातही अखंड सेवा
कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणारे भाविक असोत, शिमगा आणि गणेशोत्सवासाठी कोकणात येणारे चाकरमानी असोत किंवा संकटकाळातील प्रवासी… संतोष कीर यांनी प्रत्येक वेळी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले.
कोरोना महामारीच्या काळातील अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी मुंबईत ‘बेस्ट’ अंतर्गत सेवा बजावली. संकट कितीही मोठे असले तरी प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविण्याची जबाबदारी त्यांनी कधीही झटकली नाही.
‘लालपरीची साथ सुटताना मन खूप जड झाले आहे…’
३१ जुलै रोजी झालेल्या सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभात संतोष कीर मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले आणि वातावरण भावुक झाले. २८ वर्षांच्या सेवाप्रवासाच्या आठवणींनी त्यांच्या गळ्यात दाटून आले. डोळ्यांत अश्रू तरळत असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘आज २८ वर्षांचा हा प्रवास संपताना माझे मन अक्षरशः सुन्न झाले आहे. लालपरीच्या चालकाच्या जागेवर बसून मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ जगलो. तिचे स्टीअरिंग हातात घेताना मला कधीही आपण केवळ नोकरी करतोय असे वाटले नाही. माझ्या पाठीमागे बसलेला प्रत्येक प्रवासी हा माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे, ही भावना कायम मनात होती,’ असे त्यांनी सांगितले.
‘मी सुखरूप घरी परतावे म्हणून माझी आई, वडील (आप्पा), पत्नी आणि मुले जशी देवाकडे प्रार्थना करायची, तशीच माझ्या बसमधील प्रवाशांसाठीही त्यांच्या घरची माणसे वाट पाहत असतात. ही जाणीव मला कधीही विसरू दिली नाही. आज याच लालपरीची साथ सुटताना आणि तिचे स्टीअरिंग हातातून जाताना जणू माझ्या शरीराचा एक भागच माझ्यापासून वेगळा होत असल्यासारखे वाटत आहे,’ असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला.
या प्रदीर्घ प्रवासात कुटुंबीयांनी दिलेली खंबीर साथ तसेच लांजा आणि देवरूख आगारातील सहकारी व मित्रांनी दिलेले प्रेम आपण आयुष्यभर विसरणार नसल्याचेही त्यांनी भावुकपणे सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्तेही झाला होता सपत्नीक सत्कार
१५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभाग नियंत्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोष कीर यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर ३१ जुलै २०२६ रोजी देवरूख आगारात तसेच रात्री हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृह, कोंडगाव-साखरपा येथे त्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ पार पडला. यावेळी उपस्थित सहकारी, मित्र आणि मान्यवरांनी आपल्या लाडक्या सारथ्याला भावपूर्ण निरोप देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
२८ वर्षे लालपरीचे स्टीअरिंग सांभाळताना सलग २५ वर्षे विनाअपघात सेवा देणारा हा सच्चा सारथी सेवानिवृत्त झाला असला, तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेला दिलेले सर्वोच्च महत्त्व आणि लालपरीशी जोडलेले त्यांचे अतूट नाते देवरूख आगाराच्या स्मरणात कायम राहणार आहे.

