(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर–देवरुख मुख्य मार्गावरील नाक्याजवळ तीन दुकानांत मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. मोबाईल विक्रीचे दुकान, कोल्ड्रिंक्स विक्रीचे दुकान आणि आणखी एका दुकानाला चोरट्याने लक्ष्य केले. विशेष म्हणजे, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असतानाही पोलिसांना अद्याप त्याचा मागोवा घेता आलेला नाही.
चोरीची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, चोरीमध्ये मोबाईल फोन, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सतत वाढणाऱ्या चोऱ्या आणि पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांनी अधिक गस्त वाढवावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती: चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास दुकाने फोडली, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे दिसत आहे. फॉरेन्सिक आणि श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.
स्थानिक व्यापाऱ्यांनी चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात आणि आरोपीला लवकर पकडून शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

