(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहरात एकाच रात्री तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्याने हजारो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. संगमेश्वर एसटी बसस्थानकाजवळ, संगमेश्वर–देवरुख मार्गावरील साईराज कोल्ड्रिंक्स, दत्त कृपा मोबाईल दुकान आणि अलिशान बिर्याणी हॉटेल ही तीन दुकाने बुधवारी (८ ऑक्टोबर) मध्यरात्रीनंतर फोडण्यात आली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
तीन दुकानांवर चोरट्याचा हल्ला
राष्ट्रीय महामार्गावरून देवरुखकडे जाणाऱ्या रस्त्यावर या तिन्ही दुकानांचा परिसर आहे. बुधवारी रात्री उशिरा चोरट्याने या तिन्ही दुकानांची शटर उचकटून आत प्रवेश केला. गुरुवारी सकाळी मालक दुकान उघडण्यासाठी आले असता शटरची कुलपे तुटलेली दिसली. आत प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
साईराज कोल्ड्रिंक्सचे मालक संदेश कापडी यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता चोरटा दुकानाचे कुलूप फोडून आत जाताना आणि नंतर दोन आईस्क्रीम घेऊन बाहेर येताना दिसला. इतकेच नव्हे तर त्याने आईस्क्रीम दुकानाबाहेरच बसून खाल्ले आणि रिकामे कप तेथेच टाकले. त्यानंतर चोरट्याने इतर दुकाने फोडण्यासाठी मोर्चा वळवला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
मोबाईल दुकानात मोठी चोरी
दत्त कृपा मोबाईल दुकानाचे मालक राजेश तुकाराम आंबवकर यांच्या दुकानात चोरट्याने प्रवेश करून एकूण ₹५१,४९९ किमतीचे मोबाईल आणि साहित्य लंपास केले. त्यात ₹१,८९९ किमतीचा Vivo Y31 Pro, ₹१५,००० किमतीचा Samsung F17, ₹१३,००० किमतीचा Oppo K13X आणि इतर अॅक्सेसरीजचा समावेश आहे. चोरीनंतर चोरट्याने वापरलेली लोखंडी कटावणी आणि पाण्याचा पाइप ही हत्यारे दुकानाबाहेरच ठेवली. दुकानासमोर रिकाम्या आईस्क्रीमच्या डब्यांसह ही हत्यारे सापडल्याने पोलिसांनी चोरट्याने एकाच भागात सलग तीन दुकाने फोडल्याची खात्री व्यक्त केली आहे.
‘अलिशान बिर्याणी’ हॉटेलवरही चोरट्याचा ताव
बसस्थानकासमोरील ‘अलिशान बिर्याणी’ हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी जाळीतून चोरट्याने आत प्रवेश केला. आत प्रवेश करून त्याने तिथेच बिर्याणीवर ताव मारला आणि जाताना बिर्याणी सोबत घेऊनही गेला. किरकोळ रोकडही त्याने चोरली. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

