(संगमेश्वर / एजाज पटेल)
परचुरी पंचायत समिती गण आगामी निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेकडून पूनम महेश देसाई यांच्या उमेदवारीला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. ही माहिती समजताच परचुरी गणासह फुणगूस खाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष कार्यकर्ते, महिला आघाडी आणि ग्रामस्थांनी जल्लोष करत आपला उत्साह व्यक्त केला आहे.
फुणगूस खाडी भागातील कोंडये गावच्या विद्यमान सरपंच तसेच कसबा जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख महेश नीरा प्रभाकर देसाई यांच्या पत्नी असलेल्या पूनम देसाई सध्या कसबा जिल्हा परिषद गटाच्या महिला विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक जाणिवा, थेट जनसंवाद आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांनी त्यांना कोंडये गावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान दिला होता.
सरपंचपदाच्या कार्यकाळात पूनम देसाई यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेत पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न केले. अल्पावधीतच त्यांनी कार्यक्षम आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे संकेत मिळताच परचुरी पंचायत समिती गणातील सर्व गावांचे सक्षम प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व पंचायत समिती सभागृहात असावे, अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत होती. त्यातूनच पूनम देसाई यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी जोरदार मागणी पुढे आली. अखेर पक्ष नेतृत्वाने ही जनभावना लक्षात घेत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे देसाई कुटुंबाशी दीर्घकाळापासून विश्वासू व निकट संबंध असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महेश देसाई आणि पूनम देसाई यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. पक्षनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विकासकेंद्रित भूमिकेमुळे देसाई कुटुंबाला पक्षात विश्वासार्ह स्थान मिळाले आहे.
या उमेदवारीमुळे परचुरी पंचायत समिती गणात शिंदे शिवसेनेला मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पूनम देसाई यांच्या नेतृत्वाखाली परचुरी गणाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

