(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी गाव व परिसरात बिबट्याच्या दर्शनामुळे आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, आता या भागात गवा (रानरेडा) रेड्याचा मुक्त संचार सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. परिणामी शेतकरी, शालेय विद्यार्थी, पादचारी तसेच वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.
डिंगणी व आजूबाजूचा परिसर डोंगर-दऱ्यांत वसलेला असून, पायवाटा आणि वाहनांची वर्दळ असलेले रस्ते चारही बाजूंनी जंगलाने वेढलेले आहेत. त्यामुळे रानटी प्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात भल्या मोठ्या, अंगावर काटा आणणाऱ्या गवा रेड्याच्या दर्शनाच्या चर्चा सुरू होत्या. काही नागरिकांनी त्याला जंगलात पाहिल्याचे सांगितले, तर काहींनी थेट रस्त्यावर वाहनांच्या जवळून जाताना तो दिसल्याचा दावा केला होता. या चर्चांमुळेच गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या चर्चांना आता ठोस दुजोरा मिळाला आहे. डिंगणी गावचे उपसरपंच मिथुन निकम यांना प्रत्यक्ष गवा रेडा दिसून आला असून, त्यांनी हा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केला आहे. सदर व्हिडिओ सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सकाळी व सायंकाळी शाळेत ये-जा करणारी मुले, शेतात कामासाठी जाणारे शेतकरी तसेच पादचारी यांना मोठा धोका संभवतो. विशेषतः अचानक समोर आल्यास गवा रेडा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वनविभागाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जंगलातील अन्नटंचाई, वाढती मानवी अतिक्रमणे, जंगल क्षेत्रातील बदल तसेच पाण्याच्या शोधात रानटी प्राणी मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता वाढते. गवा रेडा हा प्रामुख्याने दाट जंगलात राहणारा शाकाहारी प्राणी असून, मानवी वस्तीतील त्याचा वावर ही गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे.

