(संगमेश्वर /प्रतिनिधी)
देवरुख नगरपंचायतीने लागू केलेल्या वाढीव मालमत्ता कराविरोधात नगरसेवक आणि नागरिकांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करवाढ अवाजवी असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा दावा करत ही करवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी आमदार निकम यांनी नगरसेवक व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या भूमिका आणि अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, तसेच करवाढीच्या मुद्द्यावर संबंधित शासन स्तरावर आणि नगरविकास विभागाशी लवकरच चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनात बंड्या बोरकर, नगरसेवक बाळा कामेरकर, निदा कापडी, निखिल कोळवणकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार निकम यांनी दिलेल्या आश्वासनानंतर देवरुख नगरपंचायतीच्या करवाढीबाबत शासन स्तरावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता देवरुखकरांचे लक्ष लागले आहे.

