(साखरपा / भरत माने)
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक रुपेश चंद्रकांत कोलते यांना यंदाचा मानाचा “यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2026” जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील कार्यासोबतच सामाजिक योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
शून्यातून सुरुवात करून प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि सातत्य या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत रुपेश कोलते यांनी आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. “श्री. स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर” या माध्यमातून त्यांनी व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकीही जपली आहे. त्यांच्या मते, “हा व्यवसाय फक्त नफा मिळवण्यासाठी नसून, समाजाशी जोडलेले नाते आहे.”
कोलते यांनी आपल्या कार्यामध्ये 60% व्यवसाय आणि 40% सामाजिक बांधिलकी या तत्त्वाचा अवलंब केला आहे. विशेषतः सौर ऊर्जा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम करत ग्रामीण भागासह मुंबई आणि महाराष्ट्रभर जनजागृती केली आहे. सोलर स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणपूरक ऊर्जेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सातत्यपूर्ण कार्य केले आहे.
मराठी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात उतरून एकमेकांना सहकार्य करावे आणि स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जावे, हा संदेशही ते आपल्या कामातून देत आले आहेत. सामाजिक भावनेतून केलेल्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा पुरस्कार असल्याची भावना कोलते यांनी व्यक्त केली.
“मी यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चे मनःपूर्वक आभार मानतो. पुढील काळातही अधिक जिद्दीने, प्रामाणिकपणाने आणि उंच ध्येय ठेवून कार्य करत राहणार,” असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. या यशाबद्दल रुपेश कोलते यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

