(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
“लग्न जुळवताना केवळ कुंडलीतील गुण न पाहता रक्तातील एचबी इलेक्ट्रोफोरोसीस (Hb Electrophoresis) तपासणीचा अहवाल जुळवणे ही काळाची गरज आहे. समाजाने या दिशेने जनजागृतीची क्रांती घडवली, तर भविष्यातील अनेक बालकांचे आयुष्य वाचू शकते,” असे प्रभावी प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी संजय डोर्ले यांनी केले. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त (८ मे) प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे आयोजित जनजागृती व मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा समन्वयक डॉ. उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ मे दरम्यान “थॅलेसेमिया सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या घोषवाक्याखाली विविध आरोग्य संस्थांमार्फत जनजागृती उपक्रम राबवले जात असून, त्याच अभियानाचा भाग म्हणून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी “थॅलेसेमिया मुक्त भारत” घडविण्याचा संकल्प केला. मार्गदर्शन करताना डॉ. डोर्ले यांनी थॅलेसेमियाचे स्वरूप अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केले. “रक्तातील हिमोग्लोबिन हे शरीरासाठी ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या इंजिनसारखे काम करते. थॅलेसेमिया रुग्णांमध्ये हे इंजिन कमकुवत असल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्ण कायम अशक्त व निस्तेज राहतो,” असे त्या म्हणाल्या.
हा आजार संसर्गजन्य नसून पूर्णपणे आनुवंशिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘थॅलेसेमिया मायनर’ असलेल्या दोन व्यक्तींचे विवाह झाल्यास त्यांच्या अपत्याला ‘थॅलेसेमिया मेजर’ होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. अशा बालकांना दर १५ ते ३० दिवसांनी नियमित रक्त द्यावे लागते, अशी माहितीही त्यांनी दिली.थॅलेसेमियावर नियमित रक्तसंक्रमण, आयर्न चेलेशन थेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट यांसारखे उपचार उपलब्ध असले तरी रक्त हीच या रुग्णांची जीवनरेखा असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या उपक्रमात आरोग्य सहायक भस्मे, स्टाफ नर्स श्रीम. बी. के. गुरव, एलएचव्ही श्रीम. डी. डी. सावंत, फार्मसी ऑफिसर अनमोल यादव, आरोग्य सेविका श्रीम. एस. एस. गावडे, लॅब ऑफिसर एन. एम. पटेल, आरोग्य सेवक जे. पी. पाटील, चालक व्ही. व्ही. आंबवकर, डेटा एंट्री ऑपरेटर अश्विनी शिंदे, टेली स्टाफ श्रीम. तीर्था भोसले, विकास कदम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

