(संगमेश्वर / एजाज पटेल)
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख आणि मध्यवर्ती व्यापारी केंद्र असलेली संगमेश्वर बाजारपेठ गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सज्ज झाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बाजारपेठेत उत्सवी चैतन्य निर्माण झाले असून, विद्युत रोषणाई, विविध रंगांच्या माळा, आकर्षक मखरे, सुगंधी साहित्य आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठ फुलून गेली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असून, विशेषतः सायंकाळी पाच वाजल्यानंतर ग्रामीण तसेच शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत आहेत.
गणरायाची आरास आकर्षक आणि उठावदार करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शहरातील विविध भागांत विशेष स्टॉल्स उभारले आहेत. यंदा पूजेच्या साहित्यामध्ये सुगंधी वस्तू आणि अगरबत्त्यांचे अनेक नवीन प्रकार तसेच नवीन ब्रँड्स दाखल झाले असून, त्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. चाफा, मोगरा, चंदन आणि गुलाब अशा विविध नैसर्गिक सुगंधांच्या अगरबत्त्या उपलब्ध आहेत. विशेष आकर्षण ठरत आहेत ते ४ फूट आणि ५ फूट लांबीचे भव्य सुगंधी अगरबत्ती काड्या. दीर्घकाळ जळणाऱ्या आणि मंदिरासारखा प्रसन्न सुगंध निर्माण करणाऱ्या या अगरबत्त्यांची गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.
यासोबतच नैसर्गिक भीमसेनी कापूर, विविध प्रकारचे सुगंधी धूप, अष्टगंध, हळदी-कुंकू, फुलवाती, अक्षता आणि रांगोळीचे विविध छाप व रंग बाजारात उपलब्ध आहेत. पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी नक्षीकाम केलेली आकर्षक तबके, पात्रे, अस्तर, गणेशमूर्तीसाठी सुंदर उपरणे तसेच चांदीचे मोदक, दूर्वा, कंबरपट्टा, मूषक आणि चंदनहारही विक्रीसाठी आले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे ते ‘श्री गणेश पूजन’ आणि ‘सत्यनारायण पूजा बॉक्स’. पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य एकाच बॉक्समध्ये उपलब्ध होत असल्याने स्वतंत्रपणे प्रत्येक वस्तू खरेदी करण्याचा त्रास वाचतो. त्यामुळे नोकरदारांसह अनेक नागरिकांचा या पूजा बॉक्सच्या खरेदीकडे कल वाढला आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे पूजेच्या साहित्याच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी गणेशभक्तांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही.
दररोज ताजी फुले आणण्याची गरज आणि वाळलेल्या फुलांच्या निर्माल्याचा प्रश्न टाळण्यासाठी यंदा कापडी, कागदी आणि प्लास्टिकपासून तयार केलेल्या आकर्षक सजावटीच्या साहित्यालाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. खऱ्या फुलांसारख्या दिसणाऱ्या विविधरंगी माळा, तोरणे, गुच्छ, झिरमळ्या तसेच केळीची पाने, विड्याची पाने आणि जास्वंदाच्या फुलांचे कृत्रिम प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. धुवून पुन्हा वापरता येत असल्याने या सजावटीच्या साहित्यामुळे निर्माल्याची समस्याही कमी होते.
गुलाबी, पिवळ्या आणि लाल रंगांच्या हारांची विक्री ५० रुपयांपासून पुढे सुरू आहे. किरकोळ विक्रेते १०० रुपयांत दोन माळा देत आहेत. विविध डिझाईनमधील मण्यांचे हार १०० ते ५०० रुपये, आकर्षक आसने ५० ते १०० रुपये, तर एक फुटापासून मोठ्या मूर्तींपर्यंत वापरता येणाऱ्या मोत्यांच्या व खड्यांच्या सुंदर कंठ्या १०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. या वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने त्यांनाही चांगली मागणी आहे.
बाप्पाच्या मखराच्या सजावटीतही यंदा आधुनिकतेची झलक पाहायला मिळत आहे. थर्माकॉलला पर्याय म्हणून अॅक्रेलिक, लाकूड आणि एमडीएफपासून तयार केलेली आधुनिक ‘डिजिटल व एलईडी फोल्डिंग मखरे’ बाजारात दाखल झाली आहेत. रिमोट किंवा मोबाईल अॅपद्वारे नियंत्रित करता येणारी ही मखरे कमी जागा व्यापणारी आणि वजनाने हलकी आहेत. एकाच मखरावर विविध प्रकारचे लाईटिंग इफेक्ट्स देता येत असल्याने या मखरांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
रंगबेरंगी विजेच्या माळा, विद्युत समई, विविध प्रकारच्या एलईडी माळा आणि मनमोहक रोषणाईच्या साहित्याने संगमेश्वर बाजारपेठ उजळून निघाली आहे. तालुक्यातील मध्यवर्ती व्यापारी केंद्र असल्याने गणेशोत्सव जवळ येत असताना पुढील काही दिवसांत बाजारपेठेतील खरेदीची लगबग आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.


