( सिंधुदुर्ग / वार्ताहर )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली घाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबोली येथील महादेव गड पॉईंटवरून एक पर्यटक तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव डॉ. आयुब सय्यद असून ते कर्नाटकातील निपाणी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. ते पेशाने डॉक्टर असल्याचेही समोर आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महादेव गड पॉईंटवरील रेलिंग ओलांडून किंवा कड्याच्या बाजूला गेल्याने डॉ. आयुब सय्यद यांचा तोल गेला आणि ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले. घटना समोर आल्यानंतर आंबोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर पर्यटकाच्या शोधासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.
दरम्यान, सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आंबोली-सांगेेली यांच्या पथकाकडून दरीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, आंबोली घाटात सुरू असलेला पाऊस, दाट धुके आणि त्यातच झालेला अंधार यामुळे दरीत उतरणे अत्यंत धोकादायक बनले. त्यामुळे रात्रीच्या वेळी बचावमोहीम थांबवण्यात आली. आता आज सकाळी ६ वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरीची खोली मोठी असल्याने आणि परिसरात पाऊस व धुक्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे बचाव पथकासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. डॉ. आयुब सय्यद यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून आवश्यक साधनसामग्रीसह मोहीम राबवली जात आहे. या घटनेनंतर महादेव गड पॉईंट परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आंबोली घाटातील पावसाळी पर्यटन धोकादायक वळणावर
आंबोली घाट हा कोकणातील प्रमुख पावसाळी पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात येथील धबधबे, दऱ्या, घाटरस्ते आणि निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. मात्र, मुसळधार पाऊस, दाट धुके, निसरडे कडे आणि खोल दऱ्यांमुळे काही पर्यटनस्थळे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षा कठडे किंवा रेलिंग ओलांडून कड्याच्या दिशेने जाणे टाळणे गरजेचे आहे.
रायगड-रत्नागिरीला यलो अलर्ट; धबधब्यांवर जाण्यास बंदी
दरम्यान, कोकणातील पावसाची स्थितीही गंभीर बनली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, दोन्ही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, काही ठिकाणी पाण्याचा प्रवाहही वाढला आहे.
पावसाचा जोर वाढल्याने धबधबे आणि नदीकाठच्या परिसरातही धोका निर्माण झाला आहे. फेसाळणारे धबधबे रौद्ररूप धारण करत असून, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पर्यटकांना धबधब्यांवर जाण्यास सक्त मनाई केली आहे. नागरिक आणि पर्यटकांनी पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करावे आणि नदी, धबधबे, खोल दऱ्या तसेच कड्यांच्या परिसरात विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आंबोलीतील महादेव गड पॉईंटवरून ४०० फूट खोल दरीत कोसळलेल्या डॉ. आयुब सय्यद यांचा शोध घेण्यासाठी सकाळी सहा वाजता पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले असून या शोधमोहीमेच्या पुढील अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

