(क्रीडा / वृत्तसंस्था)
आगामी दुलीप ट्रॉफी 2026-27 साठी उत्तर विभागाचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीने कन्हैया वाधवान याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दिल्लीचा फलंदाज यश धुल उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे.
उत्तर विभागाच्या संघात अष्टपैलू आयुष बडोनी यालाही स्थान मिळाले आहे. दुलीप ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात उत्तर विभागाचा सामना ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
जम्मू-काश्मीरच्या 6 खेळाडूंचे संघात वर्चस्व
गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात विजेतेपद पटकावणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंचे उत्तर विभागाच्या संघात वर्चस्व पाहायला मिळाले आहे. रणजी विजेत्या संघातील तब्बल सहा खेळाडूंना दुलीप ट्रॉफीसाठी निवडण्यात आले आहे. कर्णधार कन्हैया वाधवान याच्यासह कामरान इक्बाल, अब्दुल समद, आबिद मुश्ताक, सुनील कुमार आणि युद्धवीर सिंग यांचा संघात समावेश आहे.
अब्दुल समदची दमदार कामगिरी ठरली निर्णायक
गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात अब्दुल समद जम्मू-काश्मीरसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 15 डावांत 57.53 च्या सरासरीने 748 धावा केल्या. कन्हैया वाधवान यानेही चांगली कामगिरी करत 13 डावांत 36.46 च्या सरासरीने 474 धावा केल्या. दरम्यान, सलामीवीर कामरान इक्बाल याच्यासाठी गेल्या रणजी हंगामातील अंतिम सामना विशेष ठरला. कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद 160 धावांची शानदार खेळी केली. या कामगिरीनंतर त्याची प्रथमच दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.
आबिद मुश्ताककडून फलंदाजीसह गोलंदाजीतही अपेक्षा
डावखुरा फिरकी अष्टपैलू आबिद मुश्ताक यालाही संघात स्थान मिळाले आहे. गेल्या हंगामात त्याने 445 धावा करण्यासोबत 20 बळी घेतले. उत्तर विभागाच्या फिरकी आक्रमणात आबिद मुश्ताकसोबत निशांत सिंधू याचीही महत्त्वाची भूमिका असेल. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत आबिद मुश्ताककडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील.
अर्शदीपच्या नेतृत्वाखाली वेगवान गोलंदाजीची फळी
उत्तर विभागाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग सांभाळणार आहे. त्याच्यासोबत जम्मू-काश्मीरचे युद्धवीर सिंग आणि सुनील कुमार तसेच हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांचा समावेश आहे. या चौकडीमुळे उत्तर विभागाची वेगवान गोलंदाजी भक्कम दिसत आहे.
आकिब नबीला संघात स्थान नाही, कारण काय?
गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या आकिब नबीचा उत्तर विभागाच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच काळात तो भारतीय संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर असणार असल्याने त्याला दुलीप ट्रॉफीसाठी उपलब्ध होता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
23 ऑगस्टला पश्चिम विभागाविरुद्ध पहिला सामना
उत्तर विभाग दुलीप ट्रॉफी 2026-27 मधील आपला पहिला सामना 23 ऑगस्ट रोजी बंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे खेळणार आहे. या सामन्यात उत्तर विभागासमोर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाचे आव्हान असेल. अर्शदीप सिंगसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेगवान गोलंदाज आणि जम्मू-काश्मीरच्या रणजी विजेत्या संघातील सहा खेळाडू यामुळे उत्तर विभागाचा संघ यंदाच्या स्पर्धेत किती प्रभाव पाडतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
दुलीप ट्रॉफी 2026-27 : उत्तर विभागाचा 15 सदस्यीय संघ
कन्हैया वाधवान (कर्णधार, यष्टिरक्षक), सनत सांगवान, कामरान इक्बाल, यश धुल, आयुष डोसेजा, अब्दुल समद, आयुष बडोनी (उपकर्णधार), निशांत सिंधू, अर्जुन शर्मा, आबिद मुश्ताक, अर्शदीप सिंग, सुनील कुमार, अंशुल कंबोज, युद्धवीर सिंग आणि निखिल कश्यप.

