(मुंबई)
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या प्रचारकांच्या माध्यमातून पक्षाने राज्यभर जोरदार प्रचार मोहिमेची तयारी सुरू केली आहे.
या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, तसेच ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांचा समावेश आहे. ही यादी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे जाहीर केली.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले असून प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. याआधी स्टार प्रचारकांची संख्या केवळ २० पर्यंत मर्यादित होती. मात्र पक्षांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने ही मर्यादा वाढवून ४० केली, त्यामुळे भाजपला प्रचारासाठी अधिक संघटित मोहीम राबवण्याची संधी मिळाली आहे.
भाजपच्या या यादीत अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह युवा नेते नितेश राणे यांचाही समावेश आहे. हे सर्व नेते राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रचार सभांना संबोधित करून पक्षाच्या उमेदवारांना बळ देणार आहेत.

