(अमरावती / वृत्तसंस्था)
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे नवजात शिशू अतिदक्षता विभागाला (SNCU) भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही बालकांच्या हात-पायांना भाजल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर कक्षात वेगाने आग आणि धूर पसरला. आग लक्षात येताच ड्युटीवरील डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून कक्षातील बालकांना बाहेर काढले. मात्र, या प्रयत्नांनंतरही तीन चिमुकल्या बालकांना वाचवता आले नाही.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे तीन कक्ष आहेत. प्रत्येक कक्षात १३ बालकांवर उपचार करण्याची क्षमता असून, एकूण ३९ बालकांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे. ज्या कक्षात आग लागली, तेथे त्या वेळी १२ नवजात बालके उपचार घेत होती. त्यापैकी तीन बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर सहा अर्भकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या विभागात प्री-मॅच्युअर, कमी वजनाची तसेच गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार केले जातात. त्यामुळे आग आणि धुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. काही बालकांना भाजल्याचीही माहिती समोर आली असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या कक्षांमधील काही बालकांनाही सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले.
विशेष म्हणजे, हा नवजात शिशू अतिदक्षता विभाग अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, व्हेंटिलेटरमध्ये स्फोट कशामुळे झाला आणि आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन यंत्रणा कितपत प्रभावीपणे काम करत होती, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आग लागल्यानंतर संबंधित विभागातील कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाने नेमकी कोणती पावले उचलली, याची माहितीही तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्हेंटिलेटरमध्ये झालेला स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे तीन निष्पाप नवजात बालकांचा जीव गेल्याने अमरावतीत हळहळ व्यक्त होत आहे. दुर्घटनेचे नेमके कारण आणि रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत पुढील तपासातून काय निष्पन्न होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

