(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरील पोमेंड बुद्रुक–निवसर दरम्यान रविवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रुळावर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाचे वय अंदाजे ३१ ते ३५ वर्षे असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेले राजेंद्र सिंह मुनेश्वर चौहान यांनी संबंधित तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर पडलेल्या अवस्थेत पाहिला. त्यांनी तत्काळ याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. त्यानंतर आवश्यक पंचनामा करून मृतदेह पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रियेसाठी ताब्यात घेण्यात आला.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

