(चिपळूण)
शहरातील गोवळकोट रस्त्यावर असलेल्या हायलाईफ इमारतीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा उलगडा करत चिपळूण पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. डुकराच्या शिकारीसाठी गोळी झाडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, यामध्ये विनापरवाना बंदुकीचा वापर करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये विशाल विजय पवार (वय ३६, रा. पेठमाप) व नितिन धोंडू होळकर (वय ३०, रा. कोंढे) यांचा समावेश आहे. दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले असून, नितिन होळकरकडे असलेली विनापरवाना सिंगल बोअर बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. ही घटना २९ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. हायलाईफ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे अशरफ तांबे यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून गोळी शिरल्याने एकच खळबळ उडाली. खिडकीची काच फोडत गोळी थेट घरात घुसल्याने काही काळ परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं.
या घटनेनंतर चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे विशाल पवार व नितिन होळकर यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गोळी डुकराच्या शिकारीसाठी झाडल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे विशाल पवार याची शेती हायलाईफ इमारतीजवळच असून, डुकरांचा उपद्रव वाढल्याने शिकार करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
नितिन होळकरने झाडलेली गोळी चुकून हायलाईफ इमारतीच्या दिशेने गेली व अशरफ तांबे यांच्या घरात शिरली. या धोकादायक प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, प्रितेश शिंदे, रोशन पवार व रुपेश जोगी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.