(चिपळूण / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १२ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत मांडकी-पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या खो-खो संघांनी, तसेच मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत संचलित असलेल्या गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. दापोली येथील विद्यापीठाच्या मैदानावर विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यांमध्ये मांडकी-पालवणच्या खेळाडूंनी जिद्द, कौशल्य आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, क्रीडा अधिकारी प्रा. ज्ञानोबा बोकडे, तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


