(मुंबई)
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आधीच पावसामुळे आणि इतर महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता एसटीच्या तिकिट दरवाढीचा झटका बसणार आहे. सरकारने दिवाळीसाठी एसटीच्या तिकिटांमध्ये १०% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांत काम करणाऱ्या चाकरमान्यांना दिवाळीच्या सुट्टीत घरी जाताना अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात ही दरवाढ लागू होईल.
जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने आधीच १४.९५% भाडेवाढ लागू केली होती. आता पुन्हा दिवाळीत दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे.
दरवाढ सर्व बसेसवर लागू नसणार आहे. एसटी महामंडळाच्या नवीन परिपत्रकानुसार १५ ऑक्टोंबरपासून एसटीच्या साधी (साधी मिडी), जलद, निमआराम, साधी शयनआसनी, साधी शयनयान, वातानुकुलीत शिवशाही (आसनी), वातानुकुलीत जनशिवनेरी (आसनी)च्या प्रवास भाड्यात १० टक्के भाडे वाढ केली जाणार आहे. त्यामुळे साधी (साधी मिडी)चे प्रवास भाडे प्रति टप्पा (प्रति सहा किलोमिटर) १०.०५ रुपये एवजी वाढून १२ रुपये असेल. तर लहान मुलांचे भाडे प्रति टप्पा ७ रुपये असेल. जलद बसचे भाडे १०.०५ रुपये प्रति टप्यावरून १२ रुपये तर मुलांचे भाडे ७ रुपये असेल. निमआरामचे भाडे १३.६५ रुपये प्रति टप्पा एवजी १५ रुपये असेल. तर मुलांचे भाडे ९ रुपये असेल. साधी शयनयानचे भाडे १४.७५ रुपये प्रति टप्यावरून १७ रुपये तर मुलांचे भाडे ९ रुपये असेल. वातानुकुलीत शिवशाही (आसनी)चे भाडे १४.२० रुपये प्रति टप्या एवजी १७ रुपये तर वातानुकुलीत जशिवनेरी (आसनी)चे दर १४.९० रुपयेवरून १८ रुपये केले गेले असल्याचेही महामंडळाने परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

