( सातारा )
सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल 112 कोटी 10 लाख 57 हजार रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित, भाजप नेते व सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते शेखर चरेगावकर यांना जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (25) पहाटे अटक केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे घोटाळ्यातील इतर आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे.
112 कोटींचा कथित अपहार; 50 जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणाची फिर्याद सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. फिर्यादीत यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड येथील तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पाच अधिकारी तसेच शेखर चरेगावकर यांचे नऊ नातेवाईक अशा एकूण 50 जणांनी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्वांनी बँकेच्या ठेवीदार व सभासदांच्या हिताला बाधा पोहोचवत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये 195 बोगस कर्ज खाती उघड केल्याचा गंभीर आरोपही समाविष्ट आहे.
ईडीची कारवाई; नातेवाईक अटकेत
या घोटाळ्याच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालय (ED) ने 23 डिसेंबर 2025 रोजी छापा टाकून शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी याला अटक केली होती. तर दुसरा भाऊ मुकुंद उर्फ शार्दुल चरेगावकर याला ताब्यात घेऊन दिवसभर चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी शेखर चरेगावकर नागपूर येथे असल्याने त्यांची नंतर मुंबई येथील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने कराड शहर पोलिसांकडून तपास सातारा जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
न्यायालयात सरकारी पक्षाचा जोरदार युक्तिवाद
बुधवारी शेखर चरेगावकर यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. पुष्पा जाधव यांनी जोरदार युक्तिवाद केला. “112 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असून 195 कर्ज खात्यांचा तपास, घोटाळ्याची रक्कम कुठे व कशी वापरण्यात आली, तसेच बोगस कंपन्यांचे जाळे उघड करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे,” अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
“माझा न्याय देवतेवर विश्वास” – शेखर चरेगावकर
अटकेनंतर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना शेखर चरेगावकर यांनी, “माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” एवढीच प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणात आतापर्यंत 50 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून त्यामध्ये 36 संचालक, तीन कार्यकारी अधिकारी, दोन व्यवस्थापक आणि नातेवाईकांचा समावेश आहे. यापूर्वी विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास वेगाने सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

