(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट लाभ होणार आहे.
मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’ येथे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वेतन, भत्ते, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास आणि महामंडळाच्या उत्पन्नवाढीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रताप सरनाईक म्हणाले की, “राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जवळपास १०० कोटी रुपयांची थकबाकी देण्याचाही निर्णय झाला आहे.” यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
घरभाडे भत्त्यातही वाढ
महागाई भत्त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात यावा, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी नवे नियोजन
एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तोट्यातील मार्गांचे पुनरावलोकन, बससेवेचे नियोजन, पर्यटनासाठी विशेष बस सुविधा आणि खर्च नियंत्रणावर भर दिला जाणार आहे. “नुकसानीचे रुपांतर ‘ना नफा ना तोटा’ या स्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे सरनाईक म्हणाले.
राज्यभर धावणार नवीन एसटी बसेस
एसटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नवीन बसेस दाखल करण्यात येत असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात २६४० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ३ हजार बसेसपैकी १५० बसेसचे वितरण पूर्ण झाले असून लवकरच आणखी ८०० ते ९०० बसेस दाखल होणार आहेत. दिवाळीपर्यंत राज्यातील विविध आगारांना या बसेसचे वितरण पूर्ण केले जाईल.
२०३५ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक एसटीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. राज्यभर आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून २०२७ नंतर मोठ्या प्रमाणात ईव्ही बसेस खरेदी करण्यावर भर दिला जाणार आहे.
कर्मचारी संघटनांशी समन्वयासाठी समिती
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने संवाद साधण्यासाठी सर्व संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती स्थापन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली.
या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे, वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यभरातील विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

