( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पूलाचे काम गेली पाच वर्षे अत्यंत मंद गतीने सुरु आहे. या पूलाचे काम करताना सुरक्षेचे कोणतेही उपाय केले गेले नाहीत. उलट ठेकेदाराला वाटेल तेंव्हा सोनवी पूल वाहतुकीसाठी बंद करुन वाहनचालकांचा अक्षरशः छळ केला गेला. पाच वर्षात एक पूल उभा करु न शकलेला राष्ट्रीय महामार्ग विभाग या पुलाच्या पूर्णत्वासाठी अजून दिड वर्षं वाट पाहायला लावणार अशी स्थिती असताना गेले काही दिवस या पुलाचे गर्डर चढवायचे असल्यामुळे सलग १४ दिवस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सोनवी चौक येथे दिवसभरात दहा तास बंद ठेवण्याचा घाट घातला जात आहे. मात्र या कामात राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा मोठा फटका शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला, संगमेश्वर मधील व्यापारी आणि वाहन चालकांना बसणार आहे.
सोनवी चौक येथे पूलाचे गर्डर बसवण्याचे काम हाती घेणार असल्याचे ठेकेदार कंपनीने जाहीर केले. राष्ट्रीय महामार्ग विभाग अथवा जिल्हाधिकारी तसेच तत्सम अधिकारी वर्गाकडून परवानगी मिळण्याआधीच संगमेश्वर सोनवी चौक येथे १३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर यादरम्यान सकाळी दहा ते एक, दुपारी तीन ते पाच आणि रात्री दहा ते पहाटे तीन या दहा तासांच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग संगमेश्वर सोनवी चौक येथे वाहतुकीसाठी बंद राहील असा फलक लावला गेला. हा फलक वाचून असंख्य वाहन चालक संभ्रमित झाले.
संगमेश्वरच्या आजूबाजूला अनेक माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये आणि पदवी महाविद्यालय कार्यरत आहेत. संगमेश्वरच्या आजूबाजूची अनेक गावे संगमेश्वरच्या बाजारपेठेवर येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. जेथे गर्डर चढवले जाणार आहेत तेथेच संगमेश्वरचे बस स्थानक आहे. या स्थानकातून ग्रामीण भागात बस जा ये करत असतात. शाळकरी मुले, महाविद्यालयीन मुले मुली संगमेश्वर बस स्थानकावरच अवलंबून असतात.
सोनवी पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियंत्रण आहे अथवा नाही ? असा प्रश्न उपस्थित होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने महामार्ग बंद राहणार याबाबत व्यापारी वर्ग, वाहन चालक, संस्थाचालक,शाळा महाविद्यालयांचे प्रमुख, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील ग्रामपंचायती यांची एकत्रित बैठकही बोलावलेली नाही. याबाबत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्या मनात आलं की, ते राष्ट्रीय महामार्ग बंद करू शकतात का ? असा संतप्त सवाल या निमित्ताने संगमेश्वर वासियांनी उपस्थित केला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली सोळा वर्षे रखडले असल्याने आणि सोनवी पुलाचे काम गेली पाच वर्षे अत्यंत कुर्मगतीने सुरू असल्याने आधीच संगमेश्वरवासीय त्रस्त झाले आहेत. कोकण रेल्वेचा संपूर्ण प्रोजेक्ट पाच वर्षात पूर्ण झाला मात्र सोनवी नदीवरील पूल पूर्ण होण्यास पाच वर्षे उलटली तरी प्रतीक्षाच करावी लागत आहे. पुलाच्या कामाचे गर्डर बसवण्याचे काम १३ नोव्हेंबर पासून सुरू होईल आणि ते २६ नोव्हेंबर पर्यंत चालेल असा एक फलक लावून ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग मोकळा झाला. हा फलक पाहून संगमेश्वर परिसरातील असंख्य नागरीक संभ्रमात पडले आणि वाहनचालक संतप्त झाले.
या कालावधीत पर्यायी वाहतुकीची व्यवस्था समजावून सांगितली गेली नाही. प्रत्यक्षात पुलाचे गर्डर चढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्रेन संगमेश्वर येथे दाखल होण्यापूर्वीच महामार्ग बंद ठेवण्याची तारीख जाहीर केली गेली. ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्यानेच हा गंभीर प्रकार घडला आहे. गर्डर ठेवण्याचे काम सुरू करण्याची तारीख जाहीर केली गेली मात्र प्रत्यक्षात क्रेन न आल्याने आज १४ नोव्हेंबर रोजी देखील गर्डर चढवण्याचे काम हाती घेतले गेले नाही. राष्ट्रीय विभागाचे काम मंद गतीने करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध आधीच संगमेश्वर वासीय संतप्त झाले आहेत त्यातच मार्ग बंद ठेवून नव्याने सुरू झालेला त्रास हा संतापजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला जाऊ नये अशी मागणी संगमेश्वरवासियांसह वाहन चालकांनी केली आहे. जर सोनवी चौक येथे दिवसाच्या कालावधीत महामार्ग बंद ठेवला गेला तर त्याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीवर होणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे. परिणामी दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवू नये अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
सद्यस्थितीत माभळे ते पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाला असंख्य खड्डे पडले असून याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अथवा ठेकेदार कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या दरम्यान धुळीचे अक्षरशः लोट उठत असून यामुळे वाहन चालवणे देखील अवघड झाले आहे. मोठमोठ्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. असे असतानाही खड्डे भरण्याकडे होणारे दुर्लक्ष म्हणजे ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांची बेपर्वाई असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
सध्या नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याची आचारसंहिता देखील लागू झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगर पंचायतीचे निवडणूक होत आहे. असे असताना कोणत्या अधिकारात संगमेश्वर येथे महामार्ग बंद ठेवण्याचा घाट घातला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथवा ठेकेदाराने याबाबत कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण, वाहन चालक यांची होणारी गैरसोय लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून राष्ट्रीय महामार्ग दिवसा बंद ठेवण्याला परवानगी न देता हे काम रात्रीच्या वेळी करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी संगमेश्वर वासियांनी केली आहे.
संगमेश्वरवासियांचा अंत पाहू नये…
सोनवी चौक येथे पुलाचे काम करत असताना राष्ट्रीय महामार्ग दिवसा बंद ठेवणे म्हणजे बेबंदशाही असून वाहन चालकांना पर्यायी मार्ग न सांगता हुकूमशाही पद्धतीने काम करणे अत्यंत चुकीचे आहे. ठेकेदारांच्या कारभाराला आधीच संगमेश्वर वासीय कंटाळले आहेत. यातच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आपल्या जबाबदारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या सर्व छळाला संगमेश्वर वासीय गेली अनेक वर्षे कंटाळले असून आता महामार्ग बंद ठेवून संगमेश्वर वासियांच्या भावनांचा राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीने अंत पाहू नये.
-परशुराम पवार , पदाधिकारी प्रवासी वाहतूक संघटना संगमेश्वर

