(संगमेश्वर / प्रतिनिधी)
व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे आज ज्येष्ठ जलरंग चित्रकार तथा सेवानिवृत्त कला शिक्षक विष्णू परीट यांनी शासकीय रेखाकला परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थिरचित्राचे (Still Life) प्रात्यक्षिक सादर करून मार्गदर्शन केले. जवळपास दोन तास चाललेल्या या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंकांचे निरसन करून घेतले.
प्रात्यक्षिकादरम्यान विष्णू परीट यांनी स्थिरचित्राची मांडणी, रेखाटनाची अचूक पद्धत, प्रमाणबद्धता, प्रकाश-छाया, रंगसंगती तसेच जलरंगांचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. चित्र रेखाटताना कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे, रंगांचा समतोल कसा साधावा आणि चित्र अधिक प्रभावी कसे बनवावे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले.
विष्णू परीट हे माध्यमिक विद्यामंदिर, सोनवडे येथून कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असून जलरंग चित्रकलेवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे ते राज्यभर परिचित आहेत. उत्कृष्ट निसर्गचित्रकार म्हणून त्यांची ओळख असून, दररोज निसर्गचित्र रेखाटण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण सराव आजही सुरू आहे. ग्रामीण भागात राहूनही आपल्या कलाकौशल्याच्या जोरावर त्यांनी सोनवडे गावाचे नाव राज्यभर पोहोचवले असून कला क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
शासकीय रेखाकला परीक्षेत स्थिरचित्र आणि स्मरणचित्र हे विषय विद्यार्थ्यांना तुलनेने आव्हानात्मक वाटतात. त्यामुळे पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागात या दोन्ही विषयांच्या सरावावर विशेष भर दिला जात आहे. १ जुलैपासून रेखाकला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अतिरिक्त सराव वर्ग सुरू करण्यात आले असून, अशा प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केल्याबद्दल संस्था सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी तसेच कला विभागाच्या वतीने चित्रकार विष्णू परीट यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

