( संगमेश्वर / एजाज पटेल )
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील कामगिरी बदल्यांचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच चर्चेत येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या, शैक्षणिक गरज आणि शासनाने निश्चित केलेल्या प्रशासकीय निकषांनुसार या बदल्या झाल्या असतील, तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे. मात्र, नियम आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित बाजूला ठेवून केवळ काही शिक्षकांच्या वैयक्तिक सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या असतील, तर त्यामागील नेमकी भूमिका आणि निर्णयप्रक्रिया काय होती, असा सवाल आता तालुक्यातून उपस्थित होत आहे.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मिळावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना आणि कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास, पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन यांसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशा परिस्थितीत शैक्षणिक सत्र सुरू असताना एका शाळेतील शिक्षकाला ४० ते ५० किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळेत कामगिरीवर पाठवणे, तर त्याच वेळी तेथील शिक्षकाला पहिल्या शाळेत आणणे, हा प्रकार नेमक्या कोणत्या शैक्षणिक गरजेतून करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, संबंधित दोन्ही शाळांमध्ये शिक्षक आधीपासून कार्यरत असतील, तर अशी परस्पर अदलाबदल करण्यामागील प्रशासकीय कारण काय, याचीही चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांची गरज, शिक्षकांची उपलब्धता आणि शाळेची प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय झाला आहे का, याबाबत पालक आणि नागरिकांकडून स्पष्टता मागितली जात आहे.
तालुक्यात प्रशासक असताना प्रशासकीय कारभार नियमांच्या चौकटीत सुरळीत सुरू होता. मात्र, नुकतेच शासनाचे प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी आल्यानंतर कामगिरी बदल्यांचा हा वादग्रस्त विषय का पुढे आला, असा सवालही उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींच्या आगमनानंतर प्रशासनावर कोणताही दबाव निर्माण झाला का आणि त्यातून काही शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या करण्यात आल्या का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेला कोणताही अधिकृत आधार असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्रशासनाने वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
शिक्षकांना कामगिरीवर पाठविताना अंतराची मर्यादा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळेची गरज आणि अन्य प्रशासकीय निकष विचारात घेण्याची आवश्यकता आहे. या निकषांचे पालन करूनच संबंधित बदल्या करण्यात आल्या असतील, तर प्रशासनाने त्यामागील नियम आणि कारणे स्पष्ट करावीत. त्यामुळे पालक, शिक्षक आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
मात्र, नियमांचे पालन न करता केवळ काही शिक्षकांची वैयक्तिक सोय साधण्यासाठी निर्णय घेण्यात आला असेल, तर हा गंभीर प्रशासकीय विषय ठरू शकतो. त्यामुळे या संपूर्ण कामगिरी बदल्यांची निष्पक्ष चौकशी करून निर्णयप्रक्रिया आणि त्यामागील अधिकृत निकष जाहीर करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, ‘सर्व काही नियमानुसार असेल तर हरकत नाही; मात्र नियम डावलून हा प्रकार झाला असेल तर त्यामागील निर्णयकर्ता कोण?’ असा सवाल संगमेश्वरच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

