(खेड / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडच्यावतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी भरणे येथील जोगळे बंधू हॉलमध्ये उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या खेड शाखेच्या नवनियुक्त कार्यकारिणीतील तालुका नेते संतोष जाधव, अध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव संजय जाधव, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, कोषाध्यक्ष मारुती पाटील आणि प्रसिद्धीप्रमुख सागर धप्पाधुळे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी इयत्ता चौथी ते सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी, मंथन, BDS, गुरुकुल उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी, नासा/इस्रोसाठी निवड झालेले विद्यार्थी, नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थी, दहावी व बारावीमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तसेच उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
याशिवाय सेवानिवृत्त शिक्षक, नवनियुक्त केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, उच्चशिक्षण प्राप्त शिक्षक, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळांचाही सन्मान करण्यात आला.
‘प्रत्येक शिक्षकासाठी काम करणारा संघ उभा करू’
यावेळी खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी संघाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली. खेड शिक्षक संघ तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाच्या प्रश्नांसाठी काम करेल आणि संघाचा गौरवशाली कार्याचा इतिहास कायम ठेवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातही सातत्याने प्रगती करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. “यशस्वी विद्यार्थ्यांनी आयुष्यात असेच पुढे जात देशाचे भविष्य उज्ज्वल करावे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आशू गांधी यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्याबरोबरच देशपातळीवर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजेंद्र चांदीवडे यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
केंद्रप्रमुख प्रभाकर कोळेकर यांनी नवनियुक्त कार्यकारिणीवर विश्वास व्यक्त केला. संघाने योग्य व्यक्तीची योग्य पदावर निवड केली असून अध्यक्षपदाची जबाबदारी एकनाथ पाटील यांच्याकडे सोपविल्याने संघाकडून पूर्वीप्रमाणेच प्रभावी काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती
कार्यक्रमाला विस्तार अधिकारी संदीप कंदुरकर, जिल्हा सचिव दीपक मोने, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर, संपर्कप्रमुख बाबा माने, लांजा अध्यक्ष भागवत, संचालक राजेंद्र चांदीवडे, माजी पतपेढी अध्यक्ष विलास धामणे तसेच चिपळूणचे ज्येष्ठ शिक्षक लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक समितीचे सचिव धर्मपाल तांबे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे, जुनी पेन्शन संघटनेचे गणेश सानप आणि शिक्षक भारतीचे परेश खोपडे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परशुराम सुर्वे, विजय सकपाळ, कृष्णा गंभीरे, राहुल तुगावकर, प्रमोद म्हादे, विनोद कांबळे, गणोजी माने, शरद कदम, प्रदीप धनावडे, चंद्रकांत गोवळकर, संदीप घाणेकर, प्रकाश कोदारे, मनोहर मनवळ, मंगेश चाळके, संतोष मोरे, सुधाकर पाष्टे, विनोद आरेकर, संदीप साबळे, संदीप कातोरे, नितीन शिंदे, संतोष गांगरकर, सुनील माळीपरगे, खंडू माटोरे, संजय गमरे, काशीराम बावदाने, सदाशिव सरक, चंद्रकांत रेवाळे, सचिन गमरे, प्रभाकर कोळेकर, सुभाष बारगुडे, हर्षल तळोकार, प्रल्हाद कराळे, चंद्रकांत चंदे, जनार्दन गावणकर, आशिष उतेकर, धर्मेंद्र दोरुगडे, ऋतुजा चांदीवडे, शिल्पा ढवारे, सिद्दी जाधव, स्मिता शिंदे, शुभदा कोलगे, रूपाली पाटील आणि योजनगंधा माने यांच्यासह शिक्षक संघाचे सभासद व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धीप्रमुख सागर धप्पाधुळे यांनी प्रभावीपणे केले. शेवटी सचिव संजय जाधव यांनी आभार मानत कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सभासदांचे आभार व्यक्त केले.

