(खेड / रत्नागिरी)
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीची राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “या संकटाच्या काळात राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” असा विश्वास देत त्यांनी नागरिकांना धीर दिला.
पूरामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत पालकमंत्री डॉ. सामंत यांनी प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याचे निर्देश दिले. बाधित भागातील नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करावेत तसेच प्रभावित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह शासनाकडून मिळणारी सर्व मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्षा माधवी, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, कुंदन सातपुते आदी उपस्थित होते.
व्यापारी आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर शहरातील व्यापारी आस्थापनांचे आणि नागरिकांचे झालेले नुकसान पाहून पालकमंत्री डॉ. सामंत यांनी स्थानिक व्यापारी संघटना व नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. मदतकार्य आणि पंचनाम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पूरग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

