(खेड)
खेड तालुक्यातील साखरोली गावाच्या हद्दीत रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. साखरोली पेट्रोल पंपाच्या पुढील वळणाजवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मानवी हाडे ताब्यात घेतली. त्यानंतर पंचनामा करून हे अवशेष पुढील तपासणीसाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सापडलेले अवशेष स्त्रीचे आहेत की पुरुषाचे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच हा प्रकार घातपात, अपघात किंवा आत्महत्येशी संबंधित आहे का, याबाबतही पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली असून अवशेषांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींचीही पडताळणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे साखरोलीसह संपूर्ण परिसरात भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या तपासातून नेमके काय उलगडते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

