(खेड)
शहरातील सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या सोनार आळी मित्र व महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिमगोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या या शिमगोत्सवात आकर्षक चित्ररथ आणि मिरवणुकीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला उशिरा रात्री नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून चित्ररथ आणि मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. पहाटेपर्यंत चाललेल्या या मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणाईने उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे खेड शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.
खेड शहराला शिमगोत्सवाच्या निमित्ताने चित्ररथांची एक समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभली आहे. ऐतिहासिक आणि सामाजिक प्रसंगांवर आधारित चित्ररथ आणि त्यातील कलाकारांची देखणी रंगभूषा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा सोनार आळी मित्र व महिला मंडळाने चित्ररथातून ‘पुष्पा-2’ या चित्रपटातील प्रसंग साकारला होता, जो प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला.
या चित्ररथातील प्रमुख पात्र दिलीप कारेकर यांनी साकारले होते. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे आणि देखण्या सादरीकरणामुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. चित्ररथाची आकर्षक रंगभूषा शुभम जड्याळ, तर वेषभूषा स्वप्निल वनारे आणि प्रतीक पुळेकर यांनी साकारली होती.
सोनार आळी मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जेष्ठ सभासद प्रसाद बुटाला, संजय दांडेकर, उपाध्यक्ष उदय उर्फ पप्पू गुहागरकर, खजिनदार निलेश पिंपळकर, सहखजिनदार स्वरूप दांडेकर, सहसचिव तुषार कारंजकर, सचिव स्वप्निल वनारे यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी नियोजन आणि आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान, शिमगोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने तळा-मांडवा येथील आदिवासी भागात जिन्नस तसेच लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली.
परंपरा, कला आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम असलेला हा शिमगोत्सव खेड शहराच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख जपणारा ठरल्याचे नागरिकांनी सांगितले. सोनार आळी मित्र व महिला मंडळाच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.

