(देवळे / प्रकाश चाळके)
सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे लोकप्रिय समाजसेवक व लोकनेते कै. नानासाहेब शेटे यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा साखरपा येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘कै. नानासाहेब शेटे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. नानासाहेब शेटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी कै. नानासाहेब शेटे यांच्या समाजकार्याचा गौरव करताना सांगितले की, समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणारी माणसे कधीही काळाच्या पडद्याआड जात नाहीत. त्यांचे विचार, कार्य आणि त्यांनी समाजात रुजवलेले संस्कार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतात. कै. नानासाहेब शेटे यांनी साखरपा परिसरात समाजहिताची जी परंपरा निर्माण केली, ती आजही मार्गदर्शक आहे.
कोट येथे राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक उभारण्यासाठी निधी देणार
लांजा तालुक्यातील कोट हे राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ गाव असल्याचा उल्लेख करत आमदार किरण सामंत यांनी या गावात राणी लक्ष्मीबाई यांचे स्मारक उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. सत्कारमूर्ती शांताराम सुर्वे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
यावेळी समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, युवक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘कै. नानासाहेब शेटे स्मृती पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात कै. नानासाहेब शेटे यांच्या साधेपणाचा, सेवाभावी वृत्तीचा, लोकांप्रती असलेल्या आत्मीयतेचा आणि समाजविकासासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या स्मृती जपतानाच समाजासाठी सकारात्मक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार सोहळा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
‘मध्यस्थीची गरज भासत नाही’ : बापू शेट्ये
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये यांनी प्रभावीपणे केले. यावेळी आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना त्यांनी आमदारांकडे काम घेऊन जाताना कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता भासत नाही, असे सांगितले. याचवेळी त्यांनी माजी आमदार राजन साळवी यांच्या कार्यकाळातील साखरपा परिसरातील राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत, त्यावेळी नागरिकांना कामांसाठी जया माने यांच्या पत्राची आवश्यकता भासत असल्याचे आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये, उद्योजक विष्णू शेठ रामाणे, युयुस्तु आर्ते, दत्ताराम शिंदे, संतोष केसरकर, गणपत शिर्के, राजू कुरूप, बाबाशेठ भिंगारडे, राजेश पत्त्यानी, संजय गांधी, आबा सावंत, लक्ष्मण कदम, नेत्रा शिंदे, राजेश कामेरकर, संजय कांबळे, मारुती शिंदे, विलास बेर्डे, जया माने, रजनी चिंगळे, रमाकांत शेटे, रमाकांत सुर्वे, विलास सुकम, अंकुश सुर्वे, प्रसाद अपंडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सर्व सत्कारमूर्ती, संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून कै. नानासाहेब शेटे यांच्या समाजसेवेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची ही परंपरा यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.

