(राजापूर / तुषार पाचलकर)
विधानपरिषद सदस्य तथा माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाचल ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट देत ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, व्यापारी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या या भेटीचे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सदाभाऊ खोत यांचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान पाचल परिसरातील विविध स्थानिक प्रश्न, ग्रामस्थांच्या अडचणी तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर उपस्थितांमध्ये चर्चा झाली. ग्रामीण भागातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अण्णा पाथरे, सिव्हिल इंजिनिअर जगदीश पाथरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ जाधव, तसेच संदीप बारस्कर, विनोद पवार, ओमकार ताम्हणकर, सिद्धेश गांगण, कैलास तेलंग, संकेत सक्रे, अशोक सक्रे, सत्तू सक्रे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयालाही भेट
ग्रामपंचायत कार्यालयाच्या भेटीनंतर सदाभाऊ खोत यांनी पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाला भेट दिली. यावेळी वाचनालयाच्या उपक्रमांची तसेच परिसरातील वाचन संस्कृतीची माहिती घेण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षांसह शैक्षणिक क्षेत्रात त्यांना आवश्यक मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी वाचनालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
पाचल बसस्थानकालाही धावती भेट
यानंतर सदाभाऊ खोत यांनी पाचल बसस्थानकाला धावती भेट दिली. बसस्थानक परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाचल बसस्थानकाचे व्यवस्थापक राजेश कांबळे, कर्मचारी माने व रायबाककर यांनी त्यांचे स्वागत केले.
बसस्थानकाच्या भेटीदरम्यान प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधा, बससेवेची सद्यस्थिती आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दृष्टीने एसटी वाहतुकीचे महत्त्व याबाबतही त्यांनी माहिती घेतली. पाचल हे परिसरातील महत्त्वाचे गाव असून, येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच नागरिक विविध ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे बससेवा अधिक सक्षम व नियमित राहण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
सदाभाऊ खोत यांच्या पाचल दौऱ्यामुळे ग्रामपंचायत, व्यापारी वर्ग, वाचनालय तसेच एसटी प्रशासनाशी संबंधित विविध घटकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या या भेटीचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

