(रायगड / वृत्तसंस्था)
पुणे–कोलाड मार्गावरील पहुर फाटा ते वाळंजवाडी दरम्यान मालवाहू कंटेनर तब्बल २५० फूट खोल दरीत कोसळल्याची थरारक घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर कंटेनरमध्ये चालक अडकून पडल्याने त्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू पथकासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरमधून चालक आणि क्लीनर असे दोघे प्रवास करत होते. कंटेनर दरीत कोसळल्यानंतर क्लीनर किरकोळ दुखापतींसह बाहेर पडण्यात यशस्वी झाला. मात्र, चालक कंटेनरमध्येच अडकून पडला होता.
अपघातानंतर कंटेनर दरीत एका झाडाच्या आधारावर धोकादायक स्थितीत अडकला होता. त्यामुळे घटनास्थळी पोहोचून चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढणे रेस्क्यू पथकासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले. खोल दरी, अंधार आणि कंटेनरची धोकादायक स्थिती अशा प्रतिकूल परिस्थितीतही बचावकार्य सुरू ठेवण्यात आले.
रेस्क्यू पथकाने पाच तास अथक प्रयत्न करत चालकापर्यंत पोहोचून त्याला कंटेनरमधून सुरक्षितपणे बाहेर काढले. या बचावकार्यात SVRSS Rescue Team, एरुणकर क्रेन सर्व्हिस कोलाड आणि कोलाड पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम केले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे चालकाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. २५० फूट खोल दरीत कोसळलेल्या कंटेनरमधून चालकाची पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका झाल्याने बचाव पथकाच्या कार्याचे कौतुक होत आहे.


