(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाचल गावाची ओळख आहे. येथील बुधवारचा आठवडा बाजार संपूर्ण परिसरात प्रसिद्ध असून जवळपास ४५ गावांतील नागरिक खरेदीसाठी येथे येतात. त्यामुळे प्रत्येक बुधवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पावसाळ्यापूर्वीच साठवणुकीच्या धान्याची खरेदी करण्यासाठी आज पाचलमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी प्रवासी, ग्रामस्थ तसेच पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
पाचल येथील आठवडा बाजार अंशतः ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेत तर उर्वरित बाजार थेट रस्त्यावर भरवला जातो. बाजाराचा काही भाग रस्त्यावर भरत असल्याने मुंबईहून अनुस्कुरा मार्गे कोकणात येणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दर बुधवारच्या दिवशी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे.
या वाहतूक कोंडीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनालाही जबाबदार धरले जात आहे. महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या कार्यालयातून पाचल बाजारपेठेतील रस्त्यालगतची अतिरिक्त बांधकामे हटविण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
तसेच, १३ मे रोजी राजापूर येथे आमदार किरण सामंत यांच्या जनता दरबारात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी “दोन दिवसांत कारवाई करा” असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे.
आज बाजाराच्या दिवशी जवळपास दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी राजापूर पोलीस निरीक्षक स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण करत होते. त्यांना पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक काळे, निलेश कात्रे, स्वप्नील घाडगे, रामदास पाटील आणि गोगावले यांनी मोलाचे सहकार्य केले.

