(गणपतीपुळे / वैभव पवार)
मालगुंड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेतील महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज (रविवार, २ ऑगस्ट) रोजी सकाळी उत्साहात पार पडला. या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या दळणवळणाची मोठी सोय होणार असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
रत्नागिरी तालुका महसूल विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजना विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती, रत्नागिरीचे अध्यक्ष प्रसाद ऊर्फ बाबूशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अरुण जाधव, तलाठी राजेश वीर, महसूल विभागातील कर्मचारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जांभळीचा पऱ्या ते कैलास साळवी यांच्या बागेपर्यंत रस्ता
मालगुंड येथील जांभळीचा पऱ्या ते उपळट येथील कैलास साळवी यांच्या बागेकडे जाणारा शेत-पाणंद रस्ता मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेतून विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्याची मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
कोतवडे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजेश ऊर्फ राजू साळवी आणि रत्नागिरी पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी यांच्यासह स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले असून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
७ एकर भातशेतीला मिळणार वाहतुकीची सुविधा
प्रस्तावित पाणंद रस्त्यामुळे परिसरातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. सुमारे ७ एकर भातशेती क्षेत्रात खत, बी-बियाणे, शेतीसाठी आवश्यक साहित्य शेतापर्यंत नेणे तसेच काढणीनंतर भात पिकाची वाहतूक करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
३० एकर आंबा-काजू बागायतीला फायदा
या रस्त्यामुळे परिसरातील अंदाजे ३० एकर आंबा व काजू बागायती क्षेत्रालाही मोठा लाभ होणार आहे. बागांची नियमित मशागत, खत व औषधांची वाहतूक, देखभाल तसेच हंगामात आंबा-काजू उत्पादनाची वाहतूक करणे अधिक सोपे होणार आहे. पावसाळ्यात आणि फळांच्या हंगामात शेतकऱ्यांना येणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
७५ ते ८० शेतकऱ्यांना शेतापर्यंत थेट रस्ता
पाणंद रस्त्यामुळे सुमारे ७५ ते ८० शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी पक्का आणि वादमुक्त वहिवाटीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी अवजारे, वाहने, खते, बियाणे आणि इतर साहित्य शेतापर्यंत नेणे सुलभ होणार आहे.
३०० ग्रामस्थांची मुख्य रस्त्याशी कनेक्टिव्हिटी वाढणार
मालगुंड-दुर्गवळीवाडी परिसरातील सुमारे ३०० नागरिकांना मुख्य रस्त्याशी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. परिणामी नागरिकांचे दैनंदिन दळणवळण, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, आरोग्य सुविधा आणि अन्य आवश्यक सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठीही सुरक्षित मार्ग
या पाणंद रस्त्याचा सुमारे ४० ते ५० शालेय विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रस्तावित रस्ता पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमित तसेच पावसाळी दिवसांत अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे.
शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
एकूणच, या शेत-पाणंद रस्त्यामुळे सुमारे १७५ ते १८० शेतकरी आणि ४० ते ५० विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून, मालगुंड-दुर्गवळीवाडी परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. शेतीमालाची वाहतूक, बागायतीचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची शाळेपर्यंतची ये-जा आणि ग्रामस्थांचे दैनंदिन दळणवळण यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.
रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडल्याने स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

