(जैतापूर / राजन लाड)
भारतीय संगीत कलापीठ, मुंबई यांच्या वतीने आयोजित पखवाज प्रथमा परीक्षेत फ्लॅश आर्ट अकॅडमी, जैतापूर यांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेला एकूण सात विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ (आंदुर्ले) येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालय या केंद्रावर पार पडली. विद्यार्थ्यांचे नियमित प्रशिक्षण जैतापूर येथे राकेश दांडेकर यांच्या निवासस्थानी दर रविवारी घेतले जाते. प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षक तन्मय परब (राजापूर) असून त्यांनी सातही विद्यार्थ्यांना पखवाज या भारतीय तालवाद्याचे मूलभूत आणि प्रगत शिक्षण दिले आहे.
प्रशिक्षक तन्मय परब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पखवाज वादनातील विविध ताल, बोल आणि लय यांचे उत्कृष्ट सादरीकरण परीक्षेत करून परीक्षकांची प्रशंसा मिळवली. सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळविल्याने जैतापूर परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेसाठी फ्लॅश आर्ट अकॅडमीचे संचालक राकेश दांडेकर, तसेच राजन लाड आणि अरविंद लांजेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. कुडाळ येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक आणि अलंकार पदवीधर महेश सावंत यांनी परीक्षेला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना नुकतेच जैतापूर येथे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी नागरी संरक्षण दल, रत्नागिरी चे सहाय्यक उपनियंत्रक आनंदसिंग गढरी, मास्टर ट्रेनर अक्षय जाधव, पत्रकार राजन लाड, जब्बार काझी, जैतापूर ग्रामपंचायत सदस्य रुपेश करगुटकर, सिकंदर करगुटकर, तसेच प्रशिक्षक तन्मय परब आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते.
या यशाबद्दल पालक, स्थानिक नागरिक आणि संगीतप्रेमींकडून सर्व विद्यार्थ्यांचे तसेच प्रशिक्षक तन्मय परब यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. फ्लॅश आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागात पारंपरिक संगीत साधनेचे नवे अध्याय रचले जात आहेत.

