(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील तळवडे खिंडीत पैशांच्या व्यवहारातून एका तरुणावर लाकडी दांडा व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गणेश आत्माराम आर्डे (वय ३८, रा. पाचल बाजारवाडी) गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात मावस भावासह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता गणेश आर्डे हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलने मूळ गावी काजिर्डा येथे जात होते. साडेनऊच्या सुमारास तळवडे खिंडीत पोहोचताच, पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने आपली मोटारसायकल त्यांच्या गाडीसमोर आडवी घालून त्यांना थांबवले.
यावेळी गणेश यांचा मावस भाऊ पांडुरंग गणाजी पाटेकर (रा. कोळंब) याने जुन्या पैशांच्या व्यवहाराच्या वादातून हातातील लाकडी दांड्याने त्यांच्या उजव्या हातावर जोरदार प्रहार केला. त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी साथीदारांनीही हल्ल्यात सहभाग घेतला. एका राखाडी शर्टधारी इसमाने लोखंडी रॉडने पाठीवर वार केले, तर दुसऱ्या पांढऱ्या चौकडीच्या शर्टमधील व्यक्तीने लाकडी बांबूने पायावर बेदम मारहाण केली.
हल्लेखोरांनी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी गणेश आर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी पांडुरंग पाटेकर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

