(राजापूर / तुषार पाचलकर )
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रत्नागिरी,सिंधुदुर्ग भरारी पथक आणि कणकवली येथील निरीक्षकांनी संयुक्त कारवाई करत राजापूर तालुक्यातील तळगाव येथील श्री स्वामी समर्थ हॉटेलच्या मागील खोलीत सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध बॉटलिंगचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जागामालक दिनेश शांताराम जैतापकर आणि चंदन ऊर्फ शंकर बाळू पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील तळगाव येथील हॉटेल श्री स्वामी समर्थच्या मागील खोलीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून अवैध बॉटलिंग केले जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने दोन पंच व कर्मचाऱ्यांसह हॉटेलवर छापा टाकला. यावेळी खोलीमध्ये लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे लेबल असलेले ५६ बॉक्स आढळून आले. तसेच ३० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये नारंगी रंगाच्या पातळ द्रवाने भरलेले तयार मद्याचे ब्लेंड असे एकूण ६० लिटर मद्य मिळून आले.
या ठिकाणी दारूच्या बॉटलिंगसाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक मशीन, टिळकनगर इंडस्ट्रीज लि. मेन्शन हाऊस असे छापलेली ८६ हजार ४०० पत्र्याची बुचे, एका गठ्ठ्यामध्ये २५ याप्रमाणे १०४ रिकामे बॉक्सचे गठ्ठे, कागदी पुठ्ठ्याचे ४१६ बॉक्स, ओशियन रॉक प्रीमियम ग्रेन व्हिस्की लेबलचा रोल, एका बॉक्समध्ये ४८ याप्रमाणे १ हजार ८०० बॉक्समध्ये ठेवलेल्या ८६ हजार ४०० रिकाम्या बाटल्या, तसेच ३५ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये १८० मिली क्षमतेच्या १ हजार ६८० काचेच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या.
याशिवाय १२० बॉक्समध्ये कागदी जाळी व कागदी जाळी असलेले एका गठ्ठ्यात ५० याप्रमाणे एकूण ४२ गड्डे, ५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, १ हजार लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या तीन टाक्या, २५ प्लास्टिक ट्रे, कागदी पुठ्ठ्याचे १२० बॉक्स, १२३ रिकाम्या गोण्या, टेबल, खुर्च्या, स्टूल, लोखंडी ट्रॉली, मोटर, होजपाईप, रॅक, बॉटलिंगसाठी लागणाऱ्या इतर वस्तू आणि दोन मोबाईल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळून आलेल्या मद्याची अंदाजे किंमत व इतर मुद्देमाल असा एकूण १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जागामालक दिनेश शांताराम जैतापकर, रा. तळगाव, ता. राजापूर, जि. रत्नागिरी आणि चंदन ऊर्फ शंकर बाळू पाटील, रा. कुट्टालिन, फ्रान्सिसवाडी, पणजी, गोवा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री. प्रसाद सुर्वे, सहआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आणि श्रीमती कीर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाचे निरीक्षक अमित पाडळकर, निरीक्षक रवि मोरे, दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, मानस पवार, अनुराग बर्वे, निवेद सुर्वे, जवान सागर उबाळे, सुजल गुडे, जवान-नि-वाहनचालक विशाल विचारे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपअधीक्षक ओमकार महाजन, निरीक्षक नितीन शिंदे, एस. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, जवान स्नेहल कुवेसकर, रवि जानकर, किरण पाटील, ऋषिकेश शेटगे, प्रदीप भोसले, शुभम पाटील आणि अजित गावडे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर, भरारी पथक रत्नागिरी, करीत आहेत.
आरोपींना राजापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारूची विक्री, निर्मिती, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व साठा, बनावट मद्याची निर्मिती किंवा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाकडून करण्यात आले आहे. अवैध मद्यासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.


