(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणातील पावसाळी जीवनशैलीशी रानभाज्यांचे अतूट नाते आहे. मात्र, रानभाज्या कोणत्या, त्यांचे आरोग्यविषयक महत्त्व काय, कोणत्या रानभाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव आणि विक्री उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या शाळेत आणून त्यांची आकर्षक पद्धतीने दुकाने मांडली. विद्यार्थ्यांनी स्वतः रानभाज्यांची विक्री करत त्यांच्या वैशिष्ट्यांची आणि उपयोगांची माहितीही दिली.
महाराष्ट्रात पावसाळ्यात जंगल आणि रानावनात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अनेक रानभाज्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात. आळू, कुर्डू, टाकळा, कंटोरोळी, शेवळी यांसारख्या विविध रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना या महोत्सवातून करून देण्यात आली.
रानभाज्यांमध्ये आढळणारी नैसर्गिक जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फायबर आणि अन्य पोषक घटक याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जंगल परिसरात उपलब्ध असलेल्या विविध दुर्मिळ रानभाज्यांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पाककृती स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
कार्यक्रमाच्या प्रारंभी रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा संस्था सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आणि पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध स्टॉलला शिक्षक, पालक आणि उपस्थितांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता कोकाटे यांनी केले. संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे तसेच सदस्य संदीप सुर्वे आणि रमेश झगडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

